पंढरपूर : कागदपत्रांच्या तपासणीकरिता पकडलेला वाळूचा ट्रक सोडण्याच्या कारणावरुन परिवहन मोटार वाहनाचे अधिकारी व वाळू वाहतूक करणार्या चालकात हाणामारी झाल्याने वाहनचालक रक्तबंबाळ झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली. मोटार वाहन परिवहन वायूवेग पथक १ चे मोटार वाहन निरीक्षक संजय फांदे यांनी शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास क्षमतेपेक्षा जादा वाळू वाहतूक करणारा ट्रक (क्ऱ एम. एच. १२ एच. डी. ४३०४) पकडून त्याला ५३ हजारांचा दंड केला. त्यानंतर दुसर्या दिवशीचे काम मोटार वाहन निरीक्षक हेमंतकुमार सोनलकर यांच्याकडे होते. शनिवारी रात्री गाडीचालक विवेक उर्फ पिंटू औदुंबर मांडवे ( आनंदनगर, टाकळी) हा गाडी सोडविण्यासाठी पंढरपुरातील जुने बसस्थानकात गेला. यावेळी त्याने गाडीविषयी बसस्थानकाच्या सुरक्षा रक्षकाला विचारले असता त्या दोघांमध्ये वाद झाला. वाद मिटवण्यासाठी गेले असता मोटार वाहन अधिकारी हेमंतकुमार सोनलकर व वाहनचालक पिंटू मांडवे यांच्यात वाद सुरु झाला. दरम्यान मोटार वाहन निरीक्षक यांच्या मदतीला असलेले रोहन पाडलकर यांनी व त्यांच्या गाडीचा चालक व बसस्थानकाचा सुरक्षा कर्मचारी वसंत तेलंग यांनी त्या वाळू वाहतुकीच्या चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये त्या वाळू वाहतूक गाडीच्या चालकाच्या डोक्याला व तोंडाला चांगलीच दुखापत झाल्याने अंगावरील शर्टावर रक्ताचे डाग पडले होते. यामुळे वाहनचालक पिंटू मांडवे यांनी पोलीस ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक सोनलकर, सहायक निरीक्षक रोहन पांडकर तसेच त्याचा चालक व जुन्या बसस्थानकातील सुरक्षा कर्मचारी वसंत तेलंग यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. यानंतर मोटार वाहन निरीक्षक सोलनकर यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दिली. पुढील तपास सपोनि. अनिल कदम करीत आहेत.
-------------------------
वाळू वाहतूक गाडीचा चालक पिंटू मांडवे याने मोटार वाहन निरीक्षक सोनलकर यांना दंड भरलेली पावती दाखवली असतानाही जादा ३ हजार रुपयांची मागणी केली. नकार दिल्याने मारहाण केली़ - विवेक मांडवे तक्रारदार