सोलापूर : मार्चअखेर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुरू राहिले. यावर्षी आरटीओ कार्यालयाचा महसूल १५७ कोटींवर गेला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली.
आर्थिक वर्षाखेर असल्याने शनिवारी शासकीय कार्यालये उशिरापर्यंत सुरू होती. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची कार्यालयीन वेळ संपल्यावर सायंकाळी उशिरार्पंत हिशोब सुरू होता. बँकांनी सायंकाळी सात वाजेपर्यंत रोकड भरण्याची मुदत दिली होती. त्यामुळे कर्मचाºयांनी हे काम आटोपून सर्व खात्यांकडून जमा झालेला महसूल बँकेत खात्यावर जमा केला.
यंदा आरटीओ कार्यालयाचा महसूल १५७ कोटी ८५ लाख ९२ हजार रुपये झाला आहे. आरटीओ कार्यालयास १४0 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यंदा उद्दिष्टापेक्षा १८ कोटी जादा महसुली उत्पन्न मिळाले आहे. दोन वर्षांपूर्वी आरटीओ कार्यालयाचा महसूल ९६ कोटी जमा झाला होता. यावर्षी रिक्षा परमिट खुले झाले.
परमिटसाठी १0 हजार रुपये नोंदणी फी ठेवण्यात आली आहे. परमिट घेतलेल्या सुमारे १६२३ जणांनी रिक्षा घेतल्या. यामुळे यातून ४ कोटी महसूल वाढला आहे. आरटीओ कार्यालयात जमा झालेला कर पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये मोटार नोंदणी फी: १९ कोटी ५१ लाख ३१ हजार ६८९ रु., सेवा शुल्क: ६0 हजार, दंड: २२ कोटी ५२ लाख, एकरकमी कर व तडजोड दंडाची वसुली: ११२ कोटी ८७ लाख, पर्यावरण कर: ८ लाख ४६ हजार, रस्ता सुरक्षा कर: १ कोटी ८६ लाख़