दक्षिण सोलापूर : ग्रामपंचायतीने डाळ मिल चालू करण्यासाठी शेतकऱ्याला नाहरकत पत्र दिले़ त्याच्या आधारे रबर रिप्रोसेस कारखान्याच्या युनिटसाठी बांधकाम करण्याचा प्रकार उघडकीस आला़ या फसवणुकीच्या विरोधात ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ़ प्रवीण गेडाम यांच्याकडे तक्रार केली़ बक्षीहिप्परगे हद्दीत डाळ मिल सुरु करण्यासाठी कन्हैय्यालाल नंदकिशोर भुतडा आणि इतर दोघांनी ग्रामपंचायतीकडे नाहरकत पत्राची मागणी केली़ ग्रामपंचायतीने तसे पत्र त्यांना दिले़ या पत्राचा दुरुपयोग करून कारखानदाराने गट नंबर १०१ मध्ये रबर रिप्रोसेस युनिट उभारण्याची तयारी सुरू केली़ सरपंच बाबुराव चव्हाण आणि ग्रामस्थांना याची कुणकूण लागली़ वस्तुस्थिती समोर येताच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले़ जि़ प़ सदस्य उमाकांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली़ रबर रिप्रोसेस युनिटमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे ग्रामपंचायतीने दिलेला पूर्वीचा परवाना रद्द करावा, असा निर्णय बक्षीहिप्परगेच्या ग्रामसभेत घेण्यात आला़ या निर्णयाच्या ठरावाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली़ भुतडा यांना दिलेले नाहरकत पत्र रद्द करून नव्या युनिटच्या उभारणीस प्रशासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली़ यावेळी डी़ एऩ गायकवाड, सरपंच बाबुराव चव्हाण, अंकुश माने, तुकाराम कोळेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते़-----------------------ग्रामसेवक कोळी यानेच दिले ना हरकत प्रमाणपत्रमाहेश्वरी प्रोसेस कंपनीने टायर रिप्रोसेसिंग युनिटसाठी डिेसेंबर २०११ मध्ये बक्षीहिप्परगे ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. तत्कालीन सरपंच तुकाराम कोळेकर यांच्याशी चर्चाही झाली. त्यानुसार ग्रामसेवक कोळी यांनीच ठराव क्रमांक-७ मध्ये विषय क्रमांक-४९ नुसार ८ नोव्हेंबर २०१२ मध्ये ना हरकत प्रमाणपत्र दिले. माहेश्वरी कंपनीने फसवणूक केली असेल तर वस्तुस्थिती बाहेर येईल. --------------------------------आम्ही २०११ साली टायर रिप्रोसेसिंग युनिटसाठी ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. त्याप्रमाणे मिळाले. त्यावरूनच प्रदूषण नियंत्रण मंडळासह अन्य परवाने घेतले. डाळ मिलचा कोठेच उल्लेख केला नव्हता. ग्रामस्थांचा आरोप चुकीचा आहे.-प्रवीण भुतडाव्यवस्थापक- माहेश्वरी प्रोसेसिंग
डाळ मिलच्या परवान्यावर रबर रिप्रोसेस कारखाना
By admin | Published: June 11, 2014 12:48 AM