सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (आ) येथील ऋषीकेश शिवानंद डोंबाळे (वय ९) या विद्यार्थ्याला मेंदूज्वर हा आजार होता, त्याला मलेरियाची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. गोवर-रुबेला ही राष्ट्रीय लसीकरण मोहीम आहे. या मोहिमेस लोकप्रतिनिधी यांचा विरोध होत असल्यास त्यांना भेटून महत्त्व पटवून देणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणासाठी शहर आणि जिल्ह्यातील १० लाख ५० हजार बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आतापर्यंत ४ लाख २४ हजार ४१६ मुलांना लस देण्यात आली आहे. यासाठी लस टोचक यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. ५ जानेवारीपर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे.
लसीकरणामुळे बाधित झालेल्या बालकांवर अधिक लक्ष ठेवण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे जिल्हा आरोग्य कार्यालयाच्या वतीने वैद्यकीय पथक मदतीला राहणार आहे. या पथकाच्या माध्यमातून बालकांना आवश्यक ती मदत, औषधे आणून देणे तसेच संपूर्ण मोफत उपचार केला जाणार असल्याचेही यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी सांगितले.
लस रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीच्बालकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हावी, यासाठी रुबेला ही लस देणे आवश्यक आहे. रुबेला ही लस बालकांसाठी चांगली आहे. आपला ज्या डॉक्टरांवर विश्वास आहे, अशा बालरोग तज्ज्ञाकडून देखील लस टोचून घेतल्यास हरकत नाही. पण बालकांच्या आरोग्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना ही लस द्यावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी केले. लसीकरणामुळे उलट्या, ताप, पुरळ येणे, चक्कर येण्याचे प्रकार घडल्यामुळे आतापर्यंंत ८८ बालके सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सर्वांवर मोफत उपचार करण्यात आल्याचे यावेळी अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांनी सांगितले.
पालकांच्या परवानगीशिवाय लस टोचू नका...च्लसीकरण करण्यापूर्वी बालकांची तपासणी करूनच त्यांना लस देण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. बालक आजारी असल्यास किंवा त्यांची इच्छा नसल्यास तसेच पालकांच्या परवानगी शिवाय बालकांना लस देऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लस देण्यासाठी कोणतीही जबरदस्ती होणार नाही असेही यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी सांगितले.