सोलापूर : समाजातील वाईट विचारांचा नाश व्हावा अन् धर्माधर्मांमध्ये, समाजासमाजांमध्ये शांती नांदण्याबरोबरच येथून दीड-दोन महिने चांगला पाऊस पडावा म्हणून आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने १० आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिरात रुद्रपूजा, रुद्राभिषेक होणार असल्याचे पंच कमिटी श्रावण मास उत्सव समितीचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शुक्रवारपासून सुरु होणाºया श्रावणमासानिमित्त मंदिर सजले असून, दर्शनासाठी येणाºया भाविकांची समितीने जय्यत तयारीही केल्याचे त्यांनी नमूद केले.
श्रावणी सोमवारला विशेष महत्व असते. यंदा चार श्रावणी सोमवार आले असून, दर सोमवारी योग समाधीला आकर्षक फुलांची मेघडंबरी उभी करुन सजावट करण्यात येते. पहिल्या श्रावणी सोमवारी शेळगी येथील सोमशेखर संगप्पा बिराजदार- पाटील, तिसºया श्रावणी सोमवारी शिवानंद कोनापुरे तर चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवारी भारत फ्लॉवर स्टॉलकडून फुलांची सजावट करुन श्री सिद्धरामेश्वर चरणी सेवा बजावली जाते.
केवळ श्रावणी सोमवारच नव्हे तर श्रावणातील प्रत्येक दिवशी दर्शनासाठी येणाºया भक्तांच्या सोयीसाठी श्री सिद्धेश्वर पंच कमिटीने चिदानंद वनारोटे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळके, काशिनाथ दर्गोपाटील यांची श्रावण मास समिती जाहीर केली आहे.
सभा मंडपात बॅरिकेड्स उभारले- श्रावणात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषत: दर श्रावणी सोमवारी ही संख्या लक्षणीय असते. रविवारी मध्यरात्रीनंतर लगतच्या ग्रामीण भागातील भाविक दर्शनासाठी बाहेर पडतात. दर्शन सुलभ अन् सुकर व्हावे यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने सभा मंडपात बॅरिकेड्स उभे केले आहेत. एका बाजूने पुरुष भाविकांना तर दुसºया बाजूने महिला भाविकांच्या दर्शनाची सोय केली आहे.
२४ तास सुरक्षा रक्षक तैनात- श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने भाविकांच्या सुरक्षेवर अधिक भर दिला आहे. पहाटे ६ ते रात्री १० आणि रात्री १० ते पहाटे सहा या दोन सत्रात म्हणजे २४ तास सुरक्षा रक्षक ठिकठिकाणी तैनात राहणार आहेत. योग समाधी, गाभारा, सभा मंडप, दासोह, मुख्य प्रवेशद्वारासह ठिकठिकाणी हे सुरक्षा रक्षक भाविकांची सुरक्षा करीत श्री सिद्धरामेश्वर चरणी आपली सेवा बजावणार आहेत.
श्री सिद्धरामेश्वरांची कीर्ती सातासमुद्रापार आहे. यंदा श्रावण मासात येणाºया भाविकांची श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने जय्यत तयारी केली आहे. परगावहून येणाºया भाविकांसाठी यात्री निवास तर भोजनासाठी दासोह विभागही सज्ज झाला आहे. -धर्मराज काडादीअध्यक्ष- श्री सिद्धेश्वर देवस्थान.
श्रावण मासानिमित्त मंदिर आणि परिसरात स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. भाविकांना कुठली अडचण येऊ नये यासाठी पंच कमिटी कार्यालयातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.-चिदानंद वनारोटेअध्यक्ष- श्रावणमास उत्सव समिती.