यामध्ये कौंडानेपूर जिल्हा अमरावती येथून सर्वांत जास्त अंतर कापून पंढरपुरात आलेली रुक्मिणीमाता पालखी बुधवारी परतीच्या प्रवासाला जाणार आहे, तर गुरुवारी अहमदनगर येथून आलेली संत निळोबाराय पालखी पंढरपूरचा निरोप घेईल. बाकीच्या मानाच्या आठ पालख्या २४ जुलै रोजी गोपालकाला झाल्यानंतर बसने परतीच्या मार्गावर निघतील. तोपर्यंत पंढरपुरात संचारबंदी कायम राहणार आहे.
मानाच्या प्रमुख दहा पालख्यांनी पारंपरिक नगर प्रदक्षिणा, रथयात्रा, चंद्रभागा स्नान, असे पारंपरिक कार्यक्रम करून भाविकांकडून जड अंत:करपूर्वक परंपरा जपण्याचा प्रयत्न होताना दिसला. शहरातील कायम गजबजलेले रस्ते, बसस्थानक, रेल्वेस्थानक, चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर पालखी तळ, पालखी मार्ग, मठ, धर्मशाळांचा परिसर, गोपाळपूर, शहरातील उपनगरे, प्रदक्षिणा मार्गावर फारशी वर्दळ दिसली नाही. किमान पुढच्या वर्षी तरी यात्रा सोहळा पूर्ववत व्हावा अशीच प्रार्थना सर्वसामान्य भाविकांनी परतताना केली.
---
वाळवंटात दिसली नाही लगबग
प्रत्येक वर्षी आषाढी यात्रा सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून तब्बल १० ते १२ लाख भाविक येत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा सोहळा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्यामुळे नेहमी पंढरपुरात दिसणारा हरिनामाचा गजर, गर्दीने फुललेले रस्ते, चंद्रभागा वाळवंटामधील लगबग दिसली नाही.