राजकुमार सारोळे
सोलापूर : कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने मोठी तत्परता दाखविल्याचे दिसून आले आहे. मोहोळ तालुक्यातील एका लग्नासाठी आलेल्या कोरोनाबाधित प्रवाशामुळे आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी दोन दिवस जागरण करून ८१७ घरांची तपासणी करून खातरजमा केल्याचे समोर आले आहे.
परदेशातून परतलेला एक तरुण मोहोळ तालुक्यातील लग्नासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसने सोलापुरात आला होता. ७ मार्च रोजी रात्री विवाह सोहळा आटोपून तो कल्याणला परतला. तेथे गेल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्याचा इतिहास तपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाºयांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना ही माहिती दिली होती. त्यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाला याबाबत सूचना केली. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी पथकासह मोहोळ तालुक्यात ठाण मांडले. लग्नाला आलेल्या त्या व्यक्तीचा कोणाकोणाबरोबर संपर्क झाला असेल, याचा शोध घेण्यात आला.
मोहोळ तालुका आरोग्य पथकाच्या मदतीने दोन दिवस दोन गावातील ८१७ घरांची तपासणी करण्यात आली. या घरातील व्यक्तींना लक्षणे आहेत काय, याची खातरजमा करण्यात आली. सर्दी व खोकला असलेल्या १५ जणांना उपचारासाठी निगराणीत ठेवण्यात आले होते. लग्नाला कोण कोण आले होते, याची खातरजमा करण्यासाठी आरोग्य विभागाने आहेराची यादी तपासली. त्या अनुषंगाने आजूबाजूच्या गावातील लोकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत आतापर्यंत एकालाही अशी लक्षणे आढळलेली नाहीत. शहर हद्दीतील एका गावात तो गेला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तेथे तपासणी केली. तसेच तो ज्या बोगीतून आला व गेला त्यावेळी त्याच्याशेजारी आसनावर असलेल्या प्रवाशांची माहिती देण्याबाबत रेल्वे प्रशासनाला कळविले होते.
रेल्वेने प्रवास केलेल्या ‘त्या’ संशयित रुग्णाबाबत जिल्हा आरोग्य विभागाने तत्परता दाखवून दोन गावात मोहीम राबविली. त्यामुळे खबरदारी घेता आली. यात कोणालाच काहीही झालेले नाही. सर्वांनी निश्चित रहावे व अफवा पसरू नयेत.- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी
सीईओ म्हणाले तुम्ही आराम करा- या मोहिमेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांना दोन दिवस झोप घेता आली नाही. याचबरोबर दररोजच्या बैठकांनाही ते हजर राहिले. या धावपळीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी आरोग्य अधिकारी जमादार यांना फोन केला. जिल्ह्याचे आरोग्य तुमच्या हातात आहे, थोडा आराम करा. इतरांवरही जबाबदाºया द्या, अशी सूचना केली.