माळशिरस : सोलापूर जिल्हा हद्दीत पिलीव घाटात रात्री एसटी बस लुटल्याची अफवा सर्वत्र पसरल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पोलिस अधिका-यांसह सातारा व सांगली जिल्ह्यातील अधिका-यांच्या ताफा पिलीव घाटात दाखल झाला. यावेळी गावकरी व पोलिसांच्या मदतीने रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन झाले. पोलिसांनी डोंगर फिरून आरोपींचा शोध घेतला. मात्र, अद्याप आरोपी हाती लागले नाही. आरोपींपर्यंत पोहोचण्याचा धागा हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत माळशिरस पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घाटात रात्री साडेदहा वाजता अचानक बस समोर काही तरुणांकडून दगडफेक झाली. यात एसटी चालक जीवराज सुभाष कदम हे जखमी झाले.तसेच एस.टी.बसमागून येणारे दुचाकीस्वार आबा दिलीप शिंदे हे जखमी झाले. मात्र यामध्ये फार मोठी हानी झाली नाही. परंतू या घटनेच्या अफवेने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू आणि सातारा जिल्ह्यातील व सांगली जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी आणि त्यांचे पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
----
विचित्र पद्धतीची घटना
उतारावरुन येणा-या वाहनांवर दगडफेक झाली. यानंतर मोटारसायकलस्वार भीतीने तिथेच थांबले. कोणीही समोर आले नाही. शिवाय वाहने अडवण्याच्या दृष्टीने हे कृत्य केले असल्यास विरुद्ध दिशेने तळाच्या बाजूला जाणा-या वाहनांवर कसलीही दगडफेक झाली नाही. त्यामुळे या घटने मागे काय उद्देश असणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र लवकरच आरोपींपर्यंत पोहोचू असा विश्चास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी व्यक्त केला.