ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 20 - सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकात दरोडा, जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे करणाºया आंतरराज्य गुन्हेगारास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथून लाड्या रामा भोसले (जामगाव ता. मोहोळ) हा मोटारसायकलवरून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा लावून लाड्याला वडापूर रस्त्यावर पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतूस, सुरा, मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याच्याविरूद्ध आतापर्यंत २२ गुन्हे दाखल आहेत. मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या २००६ सालच्या दरोडा प्रकरणातील तो फरारी आरोपी आहे. कर्नाटकातील चडचण, झळकी पोलीस ठाण्यासह सांगली जिल्ह्यातही त्याच्याविरूद्ध गुन्ह्याची नोंद आहे.
याच पथकाने चिदानंद राजशेखर बिराजदार (कोर्सेगाव ता. अक्कलकोट) या गुन्हेगारास अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त केले. हे पिस्तुल त्याने नाग्या झिझिंग्या पवार व लाड्या रामा भोसले याच्याकडून घेतल्याचे मान्य केले.
पोलीस अधिक्षक वीरेश प्रभु, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख, बाबुराव म्हेत्रे, पोलीस हवालदार सचिन वाकडे, पोलीस नाईक रवि माने, विजयकुमार भरले, पोकॉ. सचिन गायकवाड, ईस्माइल शेख आदींनी केली.