मोहन डावरे, पटवर्धन कुरोली (सोलापूर)तुका म्हणे धावा आता।आहे पंढरी विसावा।।तुकाराम महाराजांचा हा अभंग आळवित बोंडलेच्या माळरानावर श्रीसंत तुकाराम महाराज पालखीतील वारकऱ्यांनी धावा केला. या वेळी पंढरपूर येत असल्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्यामुळे कसलाही थकवा न जाणवता वारकऱ्यांनी बोरगाव मुक्काम आटोपून धावा करत पिराची कुरोली मुक्कामी मार्गस्थ झाला. श्रीसंत तुकाराम महाराज विठोबांच्या भेटीला यायचे त्या वेळी अकलूज, माळीनगर, बोरगाव, श्रीपूर, माळखांबीमार्गे पंढरपूरकडे येत होते. वाटेवरील बोंडलेच्या माळरानावर येत असताना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा दिसणारा कळस पाहून आनंदीत होऊन ‘‘धावा धावा आहे पंढरी विसावा’’ असे म्हणत बोंडलेच्या माळरानावरून पंढरपूरकडे धावत जात होते. तेव्हापासून या माळरानावर धावा करण्याची प्रथा सुरू आहे.बोरगावकरांचा मुक्काम व पाहुणचार आटोपून सोहळ्याने भल्या सकाळी पिराची कुरोलीकडे वाटचाल केली. ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, हिरवीगार झालेली धरती, अशा आल्हाददायी वातावरणात बोरगाव, तोंडले-बोंडलेमार्गे वैष्णवांची आगेकूच केली होती. दुपारी १च्या सुमारास बोंडलेच्या माळरानावरून या वैष्णवांचा मेळा टप्प्याटप्प्याने वीणेकरी, टाळकरी, झेंडेकरी, हंडेकरी महिला, तुळशीधारी महिला आदींसह विविध भक्तांनी टप्प्याटप्प्याने बोंडलेच्या माळरानावर श्रीसंत तुकारामांचा अभंग आळवित उत्साहात धावा केला.धाव्याचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंढरपूर तालुक्यासह माळशिरस तालुक्यातील भाविकांनी दुपारी बोंडलेच्या माळरानावर मोठी गर्दी केली होती. या धाव्यानंतर सायंकाळी ५ वा. सोहळा पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथे विसावला.
धावा.. धावा.. आहे पंढरी विसावा!
By admin | Published: July 13, 2016 3:45 AM