सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने १ जूनपासून दुकाने खुली करण्याची परवानगी द्यावी. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतेय म्हणून शहराला का वेठीस धरता? असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी रविवारी उपस्थित केला. १ जूनपासून दुकाने न उघडल्यास व्यापारी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला.
शहरातील बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी १ जूनपासून दुकाने खुली झालीच पाहिजेत यावर जोर दिला. चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य मोहन सचदेव म्हणाले, ग्रामीणमधील रुग्ण वाढत असल्याने शहरातील दुकाने सुरू करण्यात अडचण येत असल्याचे पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितले. सध्या नाशिक, नंदुरबार आदी ठिकाणी दुकाने सुरू होत आहेत. सुरत कापड मार्केट सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यातील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिलीच पाहिजे. सरकार व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सवलत देत नाही. पण निर्बंध लादत आहे. वीजबिलात अजूनही सवलत दिलेली नाही. कोरोनाची लस मिळत नाही. सोलापूरला कोणीही वाली नसल्याने अन्याय वाढत आहे. आता दुकाने सुरूच झालीच पाहिजे. पुन्हा कोरोना वाढला तर दुकाने बंद करा.
राज्यातील व्यापाऱ्यांच्या सर्व संघटना आता एकत्र आल्या आहेत. ज्या भागात रुग्णसंख्या कमी झाली. त्या भागात निर्बंध लावून दुकाने खुली करण्यास परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी आहे. सोलापूर शहरातील रुग्णसंख्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत आता कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने दुकानांची वेळ निश्चित परवाने देणे आवश्यक आहे. अनेक दुकानदारांचे भाडे, वीजबिल, बँकांचे हप्ते सुरूच आहेत. वारंवार होणारे नुकसान परवडणारे नाही. १ जूनपासून दुकाने सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल.
- राजू राठी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स
सोलापुरातील व्यापारी आता संतप्त झाले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. तीनवेळा आमदार, एकवेळ मंत्री राहिलेले सोलापूरचे आमदार दुकाने सुरू करावेत म्हणून महापौरांना निवेदन देतात हे शहराचे दुर्दैव आहे. खरे तर या आमदारांनी इतर आमदारांना एकत्र करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले पाहिजे होते. विभागीय आयुक्तांकडे ठाण मांडला. आम्ही व्यापाऱ्यांना घेऊन पालकमंत्र्यांना भेटलो. १ जूनपासून सोलापुरातील दुकाने सुरू झालीच पाहिजेत. अन्यथा आम्ही व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू.
- आनंद चंदनशिवे, प्रदेश प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी
शहरातील व्यापाऱ्यांचा वारंवार अंत पाहणे बरोबर नाही. प्रशासनाने ठराविक वेळ निश्चित करावी. व्यापाऱ्यांसोबत बैठक घ्यावी. काय नियम लावायचे आहेत ते लावावेत. पण दुकाने सुरू करायला परवानगी दिलीच पाहिजे. बंद दुकानातील माल चांगला आणि सडला आहे हे कळायला मार्ग नाही. अनेक लोकांना या चिंतेने रात्रभर झोप लागत नाही. कोरोनाने नव्हे तर या चिंतेमुळे काही लोकांना आयुष्यभराचा त्रास होईल. शासन आणि प्रशासनाने आता दुकाने खुली केलीच पाहिजेत.
- धवल शहा, मानद सचिव, चेंबर ऑफ कॉमर्स