सोलापूर: वारकरी भाविकांना देण्यात येत असलेल्या सेवा सुविधांची ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास पंढरपुरातील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि प्रशासनास आवश्यक सूचना केल्या. याचवेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत मिळत असलेल्या सेवासुविधांबाबतची विचारणा करून प्रशासनाला आवश्य त्या सुचना दिल्या.
दरम्यान, पालखी मार्गावर ठिकठिकाणी तात्पुरती शौचालये, पिण्याकरता स्वच्छ पाणी, निवारा यांची सोय करण्यात आली होती. तसेच वारकऱ्यांसाठी पंढरपुरमध्ये ठिकठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. वारकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी आल्यानंतर ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या हस्ते वारकऱ्यांना विनाशुल्क पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
ग्राम विकास मंत्री महाजन यांनी आज महाद्वार, चंद्रभागा वळवंट, गोपाळपूर, चौफाळा व मंदिर परिसरास भेट दिली. त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेला शासनाने प्राधान्य दिले असून यासाठी फिरता दवाखाना बाईक ॲम्बुलन्स यास आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी केली जात आहे.