गुरुवारी प्रशासनाकडून ८ ते १५ मेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडक लाॅकडाऊन असेल. आतापर्यंत दररोज सकाळी ७ ते ११ उघडी असणारी दुकानेही बंद राहणार यामुळे हे लॉकडाऊन पुढेही वाढेल की काय, या चिंतेने लोकांनी सकाळी ७ पूर्वीच दुकानांसमोर रांगा लावल्या. अशीच स्थिती पिठाच्या गिरण्यांसमोरही पाहायला मिळाली.
एकाचवेळी दुकानांसमोर वाढलेल्या गर्दीमुळे दुकानदारांचीही डोकेदुखी वाढली. आठ-दहा दिवसांसाठी पुरेल एवढा मालाचा साठा असताना येणारा प्रत्येक ग्राहक नेहमीपेक्षा दुप्पट मालाची मागणी करू लागल्याचे किराणा दुकानदारांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांशिवाय अकलूज, श्रीपूर, महाळुंग, टेंभुर्णी, करकंब, मोडनिंब, वैराग, मंद्रूप, बेगमपूर, महूद, जेऊर अशा मोठ्या गावांमध्येही जिकडेतिकडे एकच झुंबड उडालेली दिसून आली.
बार्शीतील किराणा बाजार असलेल्या दाणे गल्लीत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. भाजीमंडई, किराणा बाजार, फळ मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. चौकाचौकात उभ्या असलेल्या भाजी व फळांच्या गाड्यांवर आठवड्याचा बाजार करण्यासाठी प्रत्येक जण हातात पिशव्या घेऊन खरेदी करीत असल्याचे दिसून आले. हे चित्र सर्वत्र दिसून आले.
किराणा दुकानांत गर्दी झाल्याने व ११ वाजता दुकाने बंद करण्याचे निर्देश असल्याने अनेक दुकानदारांनी ग्राहकांच्या किराणा मालाच्या याद्या घेऊन मालक उद्या देऊ, असे सांगत दुकाने बंद केली.
-----
अन् ११ वाजताच पोलीस गाड्या फिरू लागल्या
सकाळी ७ ते ११ या वेळेतच खरेदीचे बंधन असल्यामुळे एकीकडे लोकांची बाजारात गर्दी दिसून आली. अनेकांना किराणा यादी दुकानात ठेवून परत फिरावे लागले. बरोबर ११ वाजेच्या सुमारास सायरन वाजत पोलिसांच्या गाड्या शहरभर फिरू लागल्या अन् पटापट दुकाने बंद ठेवण्यास प्रारंभ झाला. आठ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने प्रशासनाकडून खरेदीसाठी वेळ वाढवून द्यायला हवा होता, असाही सूर ग्राहकांमधून व्यक्त करण्यात आला.
-----