सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापतीसाठी लॉबिंग करण्यासाठी नेत्यांची संचालकांच्या घरी धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान सभापती विजयकुमार देशमुख यांनी संचालकांची बोलाविलेली बैठक दाेनवेळा रद्द झाली आहे.
गेल्या आठवड्यातील नाट्यमय घडामोडीनंतर बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांनी समर्थक संचालकांची १५ ऑगस्टला बैठक बोलाविली होती. त्यानंतर ही बैठक १६ ऑगस्टवर गेली. पण सोमवारी ही बैठक झालीच नाही. उप सभापती श्रीशैल नरोळे यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने बैठक लांबणीवर पडल्याचे सांगण्यात आले. सभापतीपदावर विजयकुमार देशमुखच राहणार की आणखी नव्याने कोणाला संधी देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण नव्यांना संधी देण्याचा विषय आलाच तर कोणाला संधी द्यावी यावर नेत्यांचे लॉबिंग सुरू झाले आहे.
उत्तर तालुक्यातील नान्नजचे संचालक प्रकाश चौरेकर यांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली होती. विजयकुमार देशमुख सभापती असावेत असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान शिवसेनेच्या एका नेत्यांने नान्नजला जाऊन त्यांची भेट घेऊन मनपरिवर्तनासाठी प्रयत्न केला, पण त्यांनी असे एकाबरोबर चर्चा करण्यापेक्षा एकत्रित बैठक बोलावून निर्णय घ्या. सुरूवातीलाच अशी बैठक घेतली असती तर वातावरण चिघळले नसते. अशा भेटीगाठीमुळे विनाकारण संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले. देशमुख समर्थक संचालकांकडेच अशापद्धतीनेच नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.
माने म्हणाले मी अलिप्त
माजी आमदार दिलीप माने हे गेले आठवडाभर बाजार समितीचे सभापती बदलाच्या केंद्रस्थानी होते. पण आता त्यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विचारले असता मी आता या प्रक्रियेत नाही असे माजी आमदार माने यांनी सांगितले.