Russia-Ukrain War: युक्रेनमधील मृत्यूच्या दाढेतून परतली कल्याणी, वडिलांनी घेतली होती शरद पवारांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 03:08 PM2022-03-09T15:08:43+5:302022-03-09T15:09:57+5:30
तिला पाहताच तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
शहाजी फुरडे-पाटील
बार्शी : युक्रेन आणि रशियात गेल्या बारा दिवसांपासून युद्ध संघर्ष पाहायला मिळत आहे. या युद्धाचा फटका देशातील हजारो विद्यार्थी अन् नागरिकांना बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३६ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. त्यात बार्शीतील चिखर्डे आणि दडशिंगे येथील दोन विद्यार्थीही होते. सुदैवाने बार्शीचे दोन्ही विद्यार्थी मायदेशी सुखरूप परतले. बार्शी शहरातील उपळाई रोड येथे राहणारी कल्याणी काळे ही विद्यार्थिनी सोमवारी दुपारी मायदेशी परतली. तिला पाहताच तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मृत्यूच्या दाढेतून परत आले, अशी प्रतिक्रिया तिच्या तोंडून उमटली.
काळे कुटुंबीय मूळ दडशिंगे गावचे रहिवासी असून, सध्या बार्शीत वास्तव्यास आहेत. त्यांची कन्या कल्याणी ही १० डिसेंबर २०२१ मध्ये युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षणाची माहिती घेऊन कुटुंबीयांनी उज्ज्वल भविष्यासाठी तिला पाठविले. रशियापासून ४० किमी दूर असलेल्या खारकीव्ह शहरातील कॉलेजमध्ये ती शिक्षण घेत होती. मात्र, १५ दिवसांपूर्वी रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले. दरम्यान, भारतातील पालकांची झोप उडाली. घरी आल्यानंतर कुटुंबीयांना आनंदाश्रू आले. आईच्या डोळ्यात अश्रू तरळले, तर वडिलांनी लाडक्या लेकीला मिठीत घेतले. आईनेही शिरा आणि बेसन भाकरी करून लेकीच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला.
पाण्यासाठी रांगा
युद्ध सुरू होताच बाॅम्ब हल्ले सुरू झाले. मोठे आवाज येत होते. सैनिकांच्या बंदुकांच्या फैरी झडत होत्या. बाहेर पडणे मुश्कील होते. महाविद्यालयाच्या इमारतीच्या काचा फुटल्या. पाच दिवस जेवण व्यवस्थित मिळाले; पण नंतर दाळ-भातावर दिवस काढावा लागला. कधी-कधी पाणीही मिळत नव्हते. त्यासाठी रांगा लागत होत्या. मॉलमधील खाद्यपदार्थ संपले होते. प्रत्येक ठिकाणी भारतीय दूतावासाचा स्टाफ मदतीला होता. तिने खारकीव्ह ते लिव्हीव हा रेल्वेने प्रवास केला. तेथून उजोरोद मार्गे हंगेरी बॉर्डरवर पोहोचली. तेथून विमानतळावर पोहोचली. तेथून दिल्ली आणि दिल्लीतून पुणे व पुण्यातून बार्शी असा सात दिवसांचा परतीचा प्रवास सुरू होता. युक्रेनपासून बार्शीत येईपर्यंत तिचा सर्व खर्च सरकारनेच केला.
युक्रेन देश खूप सुंदर आहे. वाईट वाटते युद्ध झाले. मला परत शिक्षणासाठी जायची इच्छा आहे. वैद्यकीय शिक्षण तसेच एम.डी., एम.एस. या पदवीची संधी अनेक देशात असल्याचे कल्याणी सांगत होती.
- कल्याणी काळे विद्यार्थिनी
शरद पवारांची घेतली होती भेट
युक्रेनमधून मुलीला मायदेशी आणण्यासाठी राज्यातील केवळ एकच व्यक्ती सक्षम वाटली. ती म्हणजे शरद पवार. त्यांची भेट घेतली. सुप्रियाताई जशा तुम्हाला एकुलत्या एक आहेत, तशीच माझी कल्याणी. म्हणून, सुप्रियाताईंसाठी तुम्ही जे केलं असतं, ते माझ्या लेकीसाठी करावं, अशी विनंती केली.
- काकासाहेब काळे
कल्याणीचे वडील