सांगोला : अखेर ‘लालपरी’तून ४ जूनपासून मालवाहतूक सुरु केली आहे. पहिल्या दिवशी मोहोळ येथून एसटीच्या मालट्रकमधून ९ टन पीव्हीसी पाईप सांगोल्यात आणण्यात आल्या आहेत. यातून पहिल्या दिवशी एसटीला इनमिन ५,६१० रुपयांचे उत्पन्न मिळाले.
सांगोल्यातून महाराष्ट्रात कोठेही शेतीमालासह व्यापाºयांचा माल वाहतुकीसाठी ३३ रुपये किलोमीटर दराने भाडे आकारले जाईल. शेतकरी, व्यापाºयांनी एसटीच्या सुरक्षित मालवाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून सांगोला आगारातील ६६ बस जागेवर थांबून होत्या. यामुळे आगाराचे सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशातच राज्यशासन व परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी लॉकडाऊनमध्ये प्रवासी वाहतुकीबरोबरच एसटीमधून मालवाहतूक सुरु करा, असे आदेश काढले होते. त्याअनुषंगाने सांगोला आगारातील जुन्या १२ बसची माहिती मालट्रक बनवण्यासाठी विभागीय कार्यालय सोलापूरला पाठवली होती. त्यानुसार सांगोला आगारास सध्या २ मालट्रक तयार करून पाठवून देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार ४ जूनपासून सांगोला आगारातून एसटीच्या मालट्रकमधून प्रति कि.मी. २८ रुपये भाडे व ५ टक्के जीएसटी असे ३३ रुपये कि.मी.ने मालवाहतूक सुरु करण्यात आली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी सांगोला येथील एका दुकानदाराच्या मोहोळ येथून ९ टन पीव्हीसी पाईप एसटीच्या मालट्रकमधून सांगोल्यात आणण्यात आल्या. यामधून एसटीला ५ हजार ६१० रुपये भाडे मिळाले असल्याचे आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी सांगितले.
खर्च वजा जाता दोन हजारांचा झाला नफा- सांगोला आगारातून एसटीच्या मालट्रकमधून मालवाहतूक सुरू झाल्याने शेतकरी व व्यापाºयांच्या मालवाहतुकीसाठी संपर्कात आहोत. मोहोळ येथून सांगोल्यात आणलेल्या ९ टन मालवाहतुकीतून सांगोला आगारास ५ हजार ६१० रूपयांच्या भाड्यातून डिझेल, चालक व इतर खर्च वजा जाता पहिल्याच दिवशी २ हजार रुपयांचा नफा मिळाला असल्याची माहिती आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी दिली.