सोलापूर : दुपारी रस्त्याने चालताना आपली सावलीही आपल्याबरोबर चालत असल्याचा अनुभव येतो. निसर्ग आणि भूगोलातील काही शास्त्रीय घडामोडींमुळे सावलीनेही आपली साथ सोडल्याचा मे महिन्यात अनुभवता येणार आहे. सोलापुरात मंगळवारी आपली सावली गायब होणार आहे.
राज्यात ३ मेपासून २८ मेपर्यंत अनेक ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा किंवा मिनिटांचा फरक असणार आहे.
महाराष्ट्रात ३ ते २८ मेपर्यंत शून्य सावली दिवस आहेत. दुपारी १२ ते १२:३० या कालावधीत शून्य सावली ही वैज्ञानिक घटना अनुभवता येईल. भारतात शेवटी मध्य प्रदेशातील भोपाळजवळून २३.५० अंशांवरून कर्कवृत्त जाते. त्यामुळे हा प्रदेश शून्य सावलीचा शेवटचा भूभाग असतो. भारतात २३.५० अंशांच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावलीचा दिवस नसतो. कारण तेथे डोक्यावर लंबरूप सूर्यकिरणे पडू शकत नाहीत. महाराष्ट्रात मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे सावली गायब झाल्याचे पाहायला मिळते.
----------
सावली जाते कुठे?
सूर्य डोक्यावरून जात असतो, तेव्हा उन्हातील व्यक्ती किंवा वस्तूची सावली पुढे-मागे न पडता खाली पायातच पडते. मात्र, ज्यावेळी काही क्षण ही सावली गायब होते, त्याला ‘शून्य सावली’ असे म्हणतात. सध्या उत्तरायण असल्याने कडाक्याचे ऊन पडले असून, राज्यातील विविध शहरे व ग्रामीण भागात हा अनुभव दरदिवशी घेता येणे शक्य आहे.
सोलापुरात मंगळवारी (दि. १०) दुपारी १२.२३ वाजता शून्य सावलीचा प्रत्यय येईल. ही खगोलीय घटना असून, विज्ञान व खगोलप्रेमींनी पाहावी. सोलापूर विज्ञान केंद्रातर्फे ही खगोलीय घटना दाखविण्यात येणार असून, याबाबतचे विश्लेषणही आम्ही करणार आहोत.
- राहुल दास, संग्रहालय अभिरक्षक, सोलापूर विज्ञान केंद्र, सोलापूर.
------
- शून्य सावली दिसण्याची वेळ (१० मे दुपारी)
- सोलापूर शहर १२.२३
- मंगळवेढा १२.२४
- सांगोला १२.२५
- मोहोळ १२.२४
- अक्कलकोट १२.२१
- पंढरपूर १२.२५
- बार्शी १२.२३
- करमाळा १२.२५
- माळशिरस १२.२६
- माढा १२.२४