सब्बाह म्हणजे देवाचा आराम करण्याचा दिवस, असे ज्यू लोकांचे म्हणणे आहे. आठवड्यातल्या शनिवारी ते सुट्टी घेतात. ही सुट्टी शुक्रवारपासून सुरू होते. ही सुट्टी आपल्यासारखी नसते. आपण रविवारीदेखील काम करतो, हे किती अभिमानानं सांगतो. इथे सुट्टी म्हणजे सुट्टी. इथली लोकल रेल्वेपण पळत नाही या दिवशी.
आपण बदली सुट्टी देतो. काही वर्कोहोलिक लोकांसाठी हे बरंय. त्यांना कळतच नाही थांबायचं कुठं. काम करत राहतात. ही जबरी सुट्टी भारीय. इतर सणासुदीच्या सुट्ट्या अगदी किरकोळ असतात. म्हणून इकडे या सुट्टीचं कौतुक. आपल्याकडे दरमहा निदान दोन तरी सणवार, जयंती, पुण्यतिथीच्या सुट्ट्या असतात. नुकतेच उत्तर प्रदेश सरकारने सुट्ट्या कमी केल्यात. नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी दिवशी त्यांचे स्मरण करावे, काही कार्यक्रम करावेत हे अपेक्षित आहे. आपल्या राज्यात पण असं व्हावं.
तर शनिवार सुट्टीचा दिवस. मला नेमका हाच विषय सापडला लिखाणाला सुरुवात करण्यासाठी. तब्बल एक आठवडा उलटून गेला मला इथे येऊन; पण खूप दिवसांपासून इथेच राहतोय असे वाटतेय. खरंतर मी इस्राईलला जाणार हे माझे मलाच खरे वाटत नव्हते. मी एकटी प्रवास करणार म्हणजे कल्याणच. कारण मुळात काही न् काही विसरणे, ऐनवेळी गोंधळणे असा माझा स्वभाव; पण यावेळी चक्क शुक्रवारी (आदल्या दिवशी) सुट्टी घेऊन पॅकिंग केले. एक चेकलिस्ट केली. ही लिस्ट मी आठवडाभर करत होते. शुक्रवारी फक्त लिस्टप्रमाणे पॅकिंग केले. लगेजच्या वजनाची अट असल्याने अगदी तोलून-मापून कपडे घेतले. बºयाच जणांनी चटणी न्यायला सांगितलेली; पण घेतली नाही. बघू या म्हटलं सात्विक आहारामुळे आपल्या तापट स्वभावात काही बदल होतोय का ते?एवढं करून थंडीचे कपडे राहिले; मग मुंबईत शाल घेतली. ठरल्याप्रमाणे तीन तास आधी आम्ही विमानतळाकडे निघालो. एवढ्या मोठ्या आलिशान कारमधून जाताना बरेच जुने दिवस आठवले; पण त्याचवेळी एफएमवर गाणं लागलं होतं ‘छोड आए हम वो गलिया...’
चेकइन करताना विचारल्या जाणाºया प्रश्नांची उजळणी अनयने करून घेतली होतीच. वास्तविक पाहता माझे जाणे अनयमुळेच झाले. अगदी फॉर्म भरण्यापासून त्याने मदत केली. हा फॉर्म भरल्यानंतर फोनवरून एक मुलाखत इस्राईल दूतावासातून घेतली जाते. मला ही मंडळी दोन दिवसांपासून कॉल करीत होती; पण मी कॉलच घेत नव्हते. अनयने फोनवरून सांगितले तेव्हा कुठे माझी मुलाखत झाली. माझी बरीच कामे तत्काळ पार पडली; पण नेमकी चेकइन करताना एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे जरा खोळंबा झाला. त्यांनी मला विचारले, या ट्रेनिंगविषयी तुम्हाला प्रथम कोणाकडून माहिती मिळाली? न गोंधळता खरी उत्तरे द्या, त्यांना तुमच्या उत्तरापेक्षा ते देताना तुमच्यातल्या आत्मविश्वासाची परीक्षा करायची असते, असे अनयने सांगितले होते. म्हणून मी डॉ. कादरभाई मॅडमचे नाव घेतले. झाले... मुस्लीम नाव ऐकल्यावर त्यांच्या भुवया ताणल्या. मग मला पुन्हा वरिष्ठांकडे पाठविले गेले. त्यांनी डॉ. कादरभार्इंची सगळी माहिती घेतली. थोडावेळ गेला; पण सुखरूपपणे या सर्व सोपस्कारातून पार पडत विमानात बसले एकदाची.
माझा हा प्रथमच प्रदेश दौरा. बरेच कुतूहल, बरीच धाकधूक लागलेली. आपण एखादी गोष्ट पूर्वी कधी केली नसेल व एकट्यानेच ती पार पाडायची असेल, तर थोडी भीती वाटणे अगदी स्वाभाविक आहे. यापूर्वी देशांतर्गत विमान प्रवास झालेला म्हणून विमानात बसण्याचं कौतुक नव्हतं. रात्रभर झोप मात्र आली नाही. वेगवेगळी माणसं, त्यांची भाषा, इस्राईलमध्ये उतरल्यावर ट्रेनिंग सेंटरपर्यंत पोहोचण्याचा ताण आदींमुळं असेल कदाचित. विमानात टीव्ही चालू होता. त्यावर इस्राईल दर्शन होत होतं. विमानातील जेवणाची चव चाखली आणि पुढे खाण्याचे काय हाल होणार आहेत, त्याची जाणीव झाली. टीव्हीवर लागलेला चित्रपट पाहत होते, भाषा कळत नव्हती; पण चेहºयावरचे हावभाव पाहून समजून घेत होते. मजा वाटत होती. आले एकदाचे तेल अविव. झाले लँडिंग. मी आधी माझे घड्याळ अॅडजस्ट केले. अडीच तास पुढे करून घेतले. माझा मोबाईल स्मार्ट असल्यानं त्यानं ते काम आधीच केलं होतं. यामुळं मला इस्राईलला राहून तेथील कृषी क्षेत्रातील बदल टिपता आले. त्यावर विपुल असं लेखन करणे शक्य झाले.- प्रा. अनिता ढोबळे(लेखिका कृषी क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)