सोलापूर : भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून रक्तदात्यांना रक्तदानास प्रवृत्त करणे हे चुकीचे असून, भेटवस्तू देऊन शिबिरे घेणाऱ्या रक्तपेढ्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा औषध विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त नामदेव भालेराव यांनी दिला.
गेल्या वर्षी रक्तदात्यांना पाच लिटर पेट्रोल तसेच इतर भेटवस्तूंचे आमिष दाखवून रक्तदान शिबिर भरवलेल्या दोन रक्तपेढ्यांचा परवाना रद्द केल्याचेही त्यांनी सांगितले. एकीकडे रक्तदान हे श्रेष्ठदान असा सोशल टच देतात तर दुसरीकडे रक्तदात्यांची संख्या वाढावी म्हणून भेटवस्तूंचे आमिष दाखवतात, हे चुकीचे आहे. अशा प्रथा वेळीच रोखल्या पाहिजेत. यासाठी जिल्हा औषध विभाग सतर्क झाला आहे.
मागच्या वर्षी तक्रार प्राप्त झाल्यानंतर औषध विभागाने दोन रक्तपेढ्यांचा परवाना रद्द केला. परंतु संबंधित रक्तपेढ्यांनी राजकीय शक्तीचा वापर करीत रद्द झालेला परवाना पुन्हा मिळविला. सोलापुरात राजकीय वरदहस्त लाभलेल्या रक्तपेढ्यांची संख्या अधिक आहे. राजकीय वर्तुळात वारंवार रक्तदान शिबिरे भरवली जातात. शिबिरांमध्ये रक्तदात्यांची संख्या वाढावी यासाठी पुढारी प्रयत्न करतात. त्यासाठी भेटवस्तूंचे आमिषही दाखविले जाते. भेटवस्तूंचे जाहीर प्रदर्शनही होते. बहुतांश ठिकाणी कार्यवाही होत नाही. विशेष म्हणजे औषध विभागाकडे मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे ग्रामीण पातळीवरील शिबिराकडे औषध विभागाला लक्ष देता येत नाही.
आमिष दाखवून रक्तदान शिबिर भरवल्यास किंवा तसा प्रचार केल्यास औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० अंतर्गत संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करू. अशी शिबिरे कुठे भरवल्यास नागरिकांनी औषध विभागाकडे तक्रार नोंदवावी.
- नामदेव भालेराव
प्रभारी सहाय्यक आयुक्त, औषध विभाग