मोहोळ : नगरपरिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ ८ मे रोजी संपला. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग, पुणे यांनी सोलापूरच्या जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना मोहोळ नगर परिषदेच्या प्रशासकपदी संबंधित उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. मोहोळ नगर परिषदेवर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली. ९ मेे रोजी त्यांनी पदभारही घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करून गावागावांत व शहरात जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आसल्याचे त्यांनी पदभार घेताच सांगितले.
मोहोळ नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल येत्या आठ मे रोजी संपत आहे. प्रशासनाने नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग उमेदवार आरक्षण व मतदारयाद्या प्रसिद्धी करणे व त्याबाबतच्या हरकतींचा कार्यक्रम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण केला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मोहोळ नगर परिषदेच्या प्रशासकपदी संबंधित उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगरपरिषदेची मुदत संपताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंढरपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे.
--
...अन हालचालींना विराम मिळाला
गेल्या अनेक महिन्यांपासून मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली होती. विविध पक्षांच्या बैठका सुरू झाल्या होत्या. परंतु, अचानक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि निवडणुका पुढे गेल्याने सुरू असलेल्या उमेदवारांच्या चाचपणी व पक्षांतर्गत हालचालींना काही महिन्यांसाठी विराम मिळाला आहे.
---
खासगी डॉक्टरांनी पुढे येवून आयसोलेशन सेंटर उभे करावे. त्यांना प्राधान्य देऊ. ग्रामीण भागात आयसाेलेशन सेंटर उभे करून हा संसर्ग कसा कमी करता येईल, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
- सचिन ढोले
प्रशासक, नगर परिषद मोहोळ