शिवानंद फुलारी
अक्कलकोट : आचारसंहितेपूर्वीपासूनच चर्चेत राहिलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनी ३६,७८९ मताधिक्य घेत काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव केला़ मतमोजणीच्या प्रथम फेरीपासूनच कल्याणशेट्टी यांनी आघाडी कायम ठेवत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूं ग लावला़. भाजपचे दिवंगत नेते पंचप्पा कल्याणशेट्टी यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करून त्यांचे सुपूत्र सचिन हे जायंट किलर ठरले.
२१ आॅक्टोबर रोजी मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. गुरुवारी सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट नवीन तहसील कार्यालय येथे मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान पहिल्या फेरीचा निकाल हाती आला. या फेरीत कल्याणशेट्टी यांनी १,७३४ मताधिक्य घेत विरोधकांचे वर्चस्व मोडीत काढायला सुरुवात केली. त्यामध्ये सतत वाढ होत राहिली. भाजप उमेदवाराला जसजसे मताधिक्य मिळत गेले तसतशी काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दीही हटत गेली. १० व्या फेरीला चित्र स्पष्ट होत असताना आमदार म्हेत्रे मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले.
दरम्यान, सचिन कल्याणशेट्टी मतदान केंद्रात आले तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेऊन एकच जल्लोष केला. सर्वत्र महायुतीचे झेंडे फार वर्षांनी फडकत राहिले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत तहसील परिसर दणाणून सोडला. २५ व्या फेरीला मिळालेले ३८ हजार ६८ मतांचे मताधिक्य पाहून कल्याणशेट्टी यांनी मतदान केंद्राच्या बाहेर येऊन कार्यकर्त्यांच्या घेरट्यातून बाहेर पडत मिरवणुकीत दाखल झाले़ प्रमुख मार्गावरुन निघालेली मिरवणूक स्वामी समर्थ महाराज मंदिराजवळ आली़ कल्याणशेट्टी यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले़ कार्यकर्त्यांना संबोधताना हा विजय केवळ कल्याणशेट्टींचा नसून कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगितले.
कल्याणशेट्टी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या कोट्यातून उमेदवारी दिली होती़ त्यांची विधानसभेची पहिलीच निवडणूक होती़ यामुळे म्हेत्रे-कल्याणशेट्टी यांच्या लढतीक डे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून होते़ ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत असल्याने देशाचे गृहमंत्री अमित शहा हे या मतदारसंघात येऊन सभा घेऊन वातावरणात भर घातली होती़ हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे आणि सिद्धाराम हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जात असल्याने या निवडणुकीकडे साºयांचे लक्ष लागून होते. २६ वी फेरी झाली आणि पोस्टल मतदानअखेर कल्याणशेट्टी यांना १,१९,४३७ तर म्हेत्रे यांना ८२,६६८ इतकी मते मिळाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी घोषित केले़ या निवडणुकीत कल्याणशेट्टी यांना ३६,७६९ मतांची आघाडी मिळाली़
...अन् म्हेत्रेंनी कल्याणशेट्टींना आलिंगन दिले- १२ व्या फेरीअखेर भाजपला १८ हजारांचे मताधिक्य मिळत असल्याचे पाहून मतमोजणी केंद्राच्या परिसरात थांबलेले सिद्धाराम म्हेत्रे हे केंद्राबाहेर निघाले़ इतक्यात प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन कल्याणशेट्टी समोर आले आणि म्हेत्रे यांना हस्तांदोलन केले़ त्यावेळी म्हेत्रे यांनी मिठी मारत आलिंगन दिले़ लढतीबाबत दोघांनी एकमेकांचे कौतुक केले़
विधानसभेतील विजय हा केवळ कल्याणशेट्टीचा नाही तर कार्यकर्त्यांचा आहे़ मागील पाच वर्षांत भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात जनतेची कामे केली आहेत़ म्हणूनच आज हे यश पाहायला मिळते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास ठेवून आपणाला उमेदवारी दिली होती.आपण तो विश्वास टिकवून ठेवला आहे़ तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावू.- सचिन कल्याणशेट्टी
विजयी महायुती उमेदवार जनतेचा कौल आपल्याला मान्य आहे. यावर आत्मचिंतन करू. कुरनूर येथील चारही पार्ट्या आपल्याक डे असताना भाजपला मताधिक्य मिळाले आहे़ मुळेगाव तांड्यातून ५० वर्षांत कधीच भाजपला मताधिक्य नव्हते. हे सगळे अनपेक्षित घडले आहे. ईव्हीएममध्ये गडबड आहे़ - सिद्धाराम म्हेत्रेपराभूत काँग्रेस उमेदवार