यावेळी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार अभिजित पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार, रमेश जाधव, सुरेश चौगुले, आलमगीर मुल्ला, बाळासाहेब शिंदे, दिलीप घुले, रवींद्र कांबळे, मिनाज खतीब यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
सांगोला ग्रामीण रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू होताच डॉ. पीयूष साळुंखे-पाटील यांनी स्वखर्चातून कोरोनाबाधित गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत म्हणून ऑक्सिजन मास्क किट, शुगर तपासणी यंत्र (२), ब्लड प्रेशर तपासणी यंत्र, वाफ यंत्र (२), साखर तपासणी स्ट्रीप दिले आहे. आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगोला ग्रामीण रुग्णालय व मेडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड हॉस्पिटलसाठी त्यांच्या फंडातून १ कोटीचा निधी दिला. त्यानंतर तातडीने दोन्ही ठिकाणी कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू केली.
सांगोला ग्रामीण रुग्णालयात ३० बेडच्या हॉस्पिटलचे काम सुरू असताना काही कारणास्तव हॉस्पिटलचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. म्हणून आ. शहाजीबापू पाटील यांनी प्रशासनातील अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत १ जूनला कोविड हॉस्पिटल सुरू करा, म्हणून चांगलेच खडसावले होते. त्यानंतर अवघ्या ५ दिवसातच सांगोला ग्रामीण रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलचे काम पूर्ण होऊन १ जूनला कोविड हॉस्पिटल सुरू केल्याने सांगोला तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.