सोलापूर : लटकलेल्या मधमाश्यांच्या पोळ्याला हात लावणे म्हणजे धाडसाचेच काम आहे. शहरी भागातून अशा पोळ्याला काढून नैसर्गिक विहारात पुनर्स्थापित करण्यात सोलापूरच्या नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांना यश आले. सोलापूर शहरातील उद्योजक पूर्णचंद्र राव यांच्या घरी बांधकाम चालू होते. त्यांच्या घरामध्ये तिसऱ्या मजल्यावर मधमाश्यांचे पोळे असल्याने बांधकामाला अडचण आली होती. ही माहिती नेचर कॉन्झर्वेशनच्या सदस्यांना मिळाल्यावर ते तिथे पोहोचले. पुठ्ठ्याचा बॉक्स, सनमाइकचा तुकडा, लोखंडी सळई व पेपर टेप इत्यादी वस्तूंचा वापर केला. छताला लागलेल्या पोळ्याला छतापासून अलगद पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये उतरवले आणि झाकून टाकले. आतमध्ये हवा जाण्यासाठी बॉक्सला बारीक छिद्रे केली. तत्काळ तो बॉक्स अलगद उचलून उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या परवानगीने व वनपरिमंडल अधिकारी शंकर कुताटे यांच्या सहकार्याने सिद्धेश्वर वनविहार या राखीव वनक्षेत्रात असलेल्या बांबूच्या झोपडीत थंड ठिकाणी मधमाश्या शांत होण्याकरिता रात्रभर तसाच ठेवण्यात आला.मधमाश्यांनी शोधली नवी जागादुसऱ्या दिवशी वन विहारात असलेल्या उंच पाण्याच्या टाकीखाली थंड ठिकाणी तो पोळा असलेला बॉक्स हलविण्यात आला. काही वेळाने त्यातल्या १५ ते २० मधमाश्या बाहेर आल्या व घोंगावत परिसराचा अंदाज घेऊ लागल्या. एक दिवसानंतर तिथे जाऊन पाहणी केली असता, बॉक्समध्ये एकही मधमाशी नव्हती. बॉक्स ठेवल्याच्या पन्नास मीटर अंतरावर एका उंच झाडाच्या फांदीला या मधमाश्यांनी नव्या पोळ्याची बांधणी सुरू केली होती.
मधमाश्यांना पाहून अनेक लोक घाबरतात. त्यामुळे या मधमाश्यांच्या पोळ्यांना जाळलं तरी जातं किंवा केमिकल टाकून मारलं जातं; पण जैवविविधतेत महत्त्वाचा भाग असणाऱ्या या मधमाश्यांचा बचाव होताना दिसत नाही, तरीही अनुभव नसताना ही कामगिरी पार पाडली.- भरत छेडा, मानद वन्यजीव रक्षक, एनसीसीएस