सांगोला : कोरोनाचे संकट असले तरी सांगोल्याच्या बाजारपेठेत केशर आंब्याचा बोलबाला सुरू आहे. बाजारात रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, त्या खालोखाल कर्नाटकी हापूस आंब्याने हवा केली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे घालून देण्यात आलेल्या कमी वेळेचा फटका या फळाला बसतोय. काही व्यापाऱ्यांनी आंबा हा नाशवंत असून, विक्रीसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवेबरोबर भाजीपाला, फळे विक्रेत्यांना सकाळी ११ वाजेपर्यंत मुभा दिली आहे. सध्या बाजारात कोकणातील प्रसिद्ध रत्नागिरी, हापूस, देवगड, हापूस व कर्नाटकी हापूस आंब्याचे आगमन झाले आहे. याबरोबरच स्थानिक केशर आंबाही खवय्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंबरोबर फळे, भाजीपाल्याची खरेदी करावी लागत आहे. बाजारात रत्नागिरी हापूस आंबा २ डझनची पेटी १,८०० ते २,००० रुपये दराने विकला जात आहे.
देवगड, हापूस आंब्याची दोन डझनची पेटी एक हजार ते १,२०० रुपये, तर कर्नाटकी हापूस आंब्याची २ डझनची पेटी ४०० ते ५०० रुपयांना विकली जात आहे. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांचा ओढा स्थानिक केशर आंब्याकडेच असल्याचे दिसून येते. बाजारात केशर आंबा ८० रुपयांपासून १२० रुपयांपर्यंत विकला जातो. सांगोल्याच्या बाजारपेठेत स्थानिक केशर आंब्याचा बोलबाला आहे.
---
सध्या आंब्याचा मोसम आहे. कोरानामुळे सकाळी ११ वाजता बाजार बंद केला जातो. त्यामुळे आंबा विक्रीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. विक्रीसाठी वेळ वाढवून द्यावी.
-सागर माळी, अंबा विक्रेता
---
तालुक्यात ५०० हेक्टरवर केशर आंबा
सांगोला तालुक्यात सुमारे जवळपास ५०० हेक्टर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड आहे. यापैकी शिवणे, वाकी, शिरभावी, हलदहिवडी येथे दर्जेदार केशर आंब्याची निर्यात केली जात आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय. मात्र, मागील दोन वर्षांपासून वादळी वारे व अवकाळी पावसामुळे नुकसानही सोसावे लागत असल्याची खंत महूद येथील आंबा उत्पादक संजय जाधव यांनी व्यक्त केली.
---
फोटो : केशर आंबा