मागील काही दिवसांपासून वरील फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे, तुम्ही देखील बघितला असेल.. इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप क्रिकेटचा सामना सुरू झालेला आहे. त्यासाठी इंग्लंडची ती महान महाराणी व सोबत दहा देशांचे कर्णधार यांचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विशेष काय आहे? या फोटोमध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराने टाय न घातल्याने त्याची अक्कल काढली जात आहे !त्याचं हसं होत आहे, त्याची सर्वत्र थट्टा उडवत आहेत? तसेच आपल्याही भारताचा प्रिय कर्णधार विराट कोहलीने जे काही वेगळ्या रंगाचे सॉक्स घातलेले आहेत किंवा बाकी लोकांसारखे ब्लॅक सॉक्स, ब्लॅक शूज न घालता ग्रे कलरचे सॉक्स व ब्राऊन कलरचे शूज घातल्यामुळे त्याला देखील लोक हसत आहेत, त्याची वाईट चर्चा करत आहेत.
परंतु, मला एक सांगा हे असं कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की, अशा प्रसंगी ब्लॅक सॉक्स व ब्लॅक शूज घालावे? कुठे लिहिलेलं आहे की सर्वांनी टाय घालून त्यावर ब्लेझर घालायचा !
कुठे असे लिहिलेले आहे की ब्राऊन शूज हे फक्त लग्नाच्या दिवशी घालायचे असतात! हे नियम कोणी बनवलेले? कुणासाठी बनवलेले आहेत? या नियमाचा व आपल्या भारतीय लोकांचा काहीतरी संबंध आहे का?मला आठवतं, लहानपणी आमच्या नवोदय विद्यालयामध्ये एक पाटील सर हो.. अतिशय हुशार शिक्षक .. ते आम्हाला लहानपणापासून सांगायचे .. इंग्रज साहेबांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केलं ...भारत सोडून गेले... परंतु आपल्याला अजूनही त्यांनी त्यांच्याच पाश्चिमात्य मानसिक गुलामगिरीमध्ये अडकून ठेवलेला आहे ...
अरे त्यांच्या देशामध्ये युरोप, इंग्लंडमध्ये बारा महिने थंडी असते म्हणून ते लोक सॉक्स, बूट, ब्लेझर, टाय, फुलशर्ट अशा राहणीमानामध्ये ते लोक राहतात ...परंतु आपला भारत, बांगलादेश, पाकिस्तान हे सर्व देश उष्ण प्रदेश, उष्णकटिबंध आहेत ...आपल्याकडे बारा महिन्यांपैकी नऊ महिने गर्मी असतेच असते. बरोबर ना? त्यातल्या त्यात आपल्या सोलारपूरमध्ये तर गर्मीच गर्मी असते ..चंद्रपूर-नागपूर सोडलं की आपलाच नंबर लागतो !
४५ डिग्री टेम्परेचरमध्ये आपण उन्हामध्ये करपून निघत असतो, पण तरीदेखील आपण सोलापूरला लग्नामध्ये किंवा इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा कुठल्याही सोशल फंक्शनच्या वेळेस आपण इंग्रजांनी ठरवून दिलेला ड्रेसकोड डोळे बंद करून वापरतो ..? बरोबर ना? काय गरज आहे आपल्याला या गरम वातावरणामध्ये लग्नाच्या दिवशी गर्मीमध्ये सॉक्स, शूज, ब्लेझर. काय एवढं करण्याची खरंच गरज आहे का?
बरं यामागे प्रचंड आर्थिक गणितदेखील आहे.. हे पाश्चिमात्य देश युरोप, इंग्लंडचे लोक वेगवेगळ्या मॉडेलना पुढे करून आपल्या मनावरती ठासून सांगतात की या ड्रेसमध्ये लग्न केलं तरच तुम्ही सुंदर ..नाहीतर तुम्ही गबाळे.. नाही.. असं अजिबात नाही. मला तर आवडता ड्रेसकोड म्हणजे साधा बरमुडा, हाफ टी-शर्ट आणि पायांमध्ये स्लीपर?आपण नाही का कुठे बाहेर गेलो फिरायला.. गोवा, तिरुपतीला बालाजीला किंवा ट्रेन प्रवासामध्ये आपण याच पोशाखामध्ये एकदम कम्फर्टेबल असतो.. बरोबर ना?
एवढं हायफाय नाही, पण साधंसुधं हाफ कॉटनचा शर्ट, साधीसुधी पॅन्ट घातली तर नाही का चालणार? गोपाळ गणेश आगरकर यांना एकच शर्ट असायचा.. रोज रात्री धुऊन स्वच्छ व नीटनेटकेपणाने वापरायचे.. मग आपण देखील तसा विचार करूयात का?या ब्लेझरच्या टायच्या मागे न लागता आपण सुद्धा साधंसुधं भारतीय वातावरणामध्ये सूट होईल, असे कपडे घातले तर नाही का चालणार?काय म्हणतात? सुरुवात कोणी करायची? अहो आपलं ठरलेलं आहे ना! नेहमी चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करायची.- डॉ. सचिन कुलकर्णी(लेखक आॅर्थोपेडिक सर्जन आहेत)