सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त ‘लोकमत’ने यंदा दीपोत्सव-२०२० ची संकल्पना मांडली असून, विविध जाती-धर्मांच्या सात संघटनांच्या सहकार्याने १० ते १२ जानेवारी २०२० पर्यंत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात अन् तलावात दिवे सोडून लक्ष दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सई महिला बचत गट अन् जगदंब-जिजाऊ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या गुरुवारपासून वाती वळणार आहेत. लक्ष दीपोत्सवात आम्हीही सहभागी होणार... तुम्हीही व्हा!’ असे आवाहन गुरुवार पेठेतील श्री शंकरलिंग महिला मंडळाने इतर जाती-धर्मांमधील महिला मंडळांना केले आहे.
शिर्डीचे श्री साईबाबा, पंढरपूरची श्री विठ्ठल-रुक्मिणी, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, तुळजापूरची भवानी माता आदी मंदिरांसह ज्या-त्या शहराचे ब्रँडिंग झाले. नऊ-साडेनऊशे वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरासह सोलापूरचे ब्रँडिंग झाले नाही. हा धागा पकडून गेल्या वर्षी ‘लोकमत’ने वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून प्रकाशमय यात्रेची संकल्पना यशस्वी केली. यंदा प्रकाशमय यात्रेबरोबरच यात्रा कालावधीत तीन दिवस लक्ष दीपोत्सव साजरा करण्याचा निर्णय सोमवारी ‘लोकमत’ भवनमध्ये सात संघटनांच्या प्रमुखांसमवेत आयोजित बैठकीत घेण्यात आला.
लक्ष दीपोत्सव सोहळा ‘न भूतो न भविष्यती’ करण्यासाठी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, विजापूर वेस युवक संघटनेचे अध्यक्ष अशपाक बागवान, समस्त ब्राह्मण समाज संघटनेचे मधुकर कुलकर्णी, जी. एम. ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, हिंदू धनगर सेनेचे अध्यक्ष अमोल कारंडे, मार्कंडेय जनजागृती संघाचे जिल्हा सचिव श्रीनिवास रच्चा, शहराध्यक्ष किशोर व्यंकटगिरी, जिल्हा कार्याध्यक्ष नितीन मार्गम, माहेश्वरी प्रगती मंडळाचे प्रवीण भुतडा यांनी पुढाकार घेतला आहे.
शंकरलिंग महिला मंडळाचा निर्धार- इंदुमती हिरेमठ- यात्रेनिमित्त यंदाचा लक्ष दीपोत्सव देखणा अन् नेटका करण्यासाठी विविध जाती-धर्मांमधील महिला मंडळे पुढे येत आहेत. लक्ष दीपोत्सवाच्या माध्यमातून वाती वळण्याबरोबर जी काही जबाबदारी मिळेल, ती यशस्वीपणे पेलण्याचा निर्धारही महिला मंडळांच्या बैठकीत पदाधिकाºयांसह सदस्यांनी केला. शंकरलिंग महिला मंडळाच्या अध्यक्षा इंदुमती हिरेमठ यांनी खास बैठक घेऊन ही माहिती दिली. मंडळाच्या उपाध्यक्षा कस्तुरी बागलकोटी, सचिव राजश्री थळंगे, सहसचिव मीनाक्षी बागलकोटी, कोषाध्यक्षा मीनाक्षी थळंगे यांच्यासह सदस्या माधुरी थळंगे, महादेवी बिज्जरगी, रूपा मणुरे, गिरीजा थळंगे, पार्वती बागलकोटी, धानम्मा धनशेट्टी, कस्तुराबाई बागलकोटी, वनिता बंटनूर, रत्ना संती, महादेवी हलकुडे, महादेवी धरणे, गीता थळंगे, भैरम्मा बिज्जरगी, लक्ष्मी विजापुरे, जयश्री दर्गोपाटील, लता धनशेट्टी, वनिता लोणी आदींनी दीपोत्सवाबाबत जनजागरण सुरु केले.
जुळे सोलापुरातील ‘तेजस्वी’ दीपोत्सव तेजोमय करणार- माधुरी डहाळे- जुळे सोलापुरातील तेजस्वी महिला मंडळही सरसावले असून, जुळे सोलापुरातील महिलांना एकत्र आणण्याचे काम दीपोत्सवाच्या माध्यमातून करणार असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा माधुरी डहाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. लक्ष दीपोत्सव हा तेजोमय करणार असल्याचे माधुरी डहाळे यांनी आयोजित बैठकीत सांगितले. यावेळी उपाध्यक्षा रंजना क्षीरसागर, सचिव संजीवनी चौगुले, शोभा जाधव, सहसचिव शुभांगी माशाळ, कोषाध्यक्षा रेश्मा माशाळ, सचिव- सुरेखा दराडे, सदस्या- सुधा धावड, भारती टाकळीकर, उमा जाधव, नीलिमा जावीर, ललिता कीर्तीवार, ज्योती काळे, पल्लवी माने, मयुरा कीर्तीवार, संगीता माने, मंजुश्री जगली, सुप्रिया सपाटे, उमा कोरे, अयोध्या कांबळे, सुमती म्हेत्रे, ज्योती जगताप, सरिता भाट, नयना आळंदकर आदी उपस्थित होत्या.
‘लोकमत’च्या संकल्पनेतून इतर सर्वच जाती-धर्मांमधील संघटनांच्या पुढाकाराने यंदा श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत लक्ष दीपोत्सव सोहळा साजरा होणार असल्याचा अधिक आनंद झाला. दीपोत्सवासाठी लागणाºया ५ ते १० हजार वाती वळण्याचे काम आमच्या संघटनेने हाती घेणार आहे. एक-दोन दिवसांमध्ये या कामाला प्रारंभ करुन श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी सेवा रुजू करण्याची संधी मिळणार आहे.-प्रियंका डोंगरे,अध्यक्षा- जगदंब-जिजाऊ प्रतिष्ठान.
‘लोकमत’ने गेल्या वर्षी प्रकाशमय यात्रा यशस्वी केली. पाठोपाठ शिवजयंतीच्या सोहळ्यात वेगळेपण पाहावयास मिळाले. यंदा ‘लोकमत’ने लक्ष दीपोत्सव सोेहळा हाती घेतला आहे. सर्वच जाती-धर्मांमधील महिला मंडळांंना एकत्र आणण्याचे काम दीपोत्सवाच्या माध्यमातून होणार आहे. दीपोत्सवासाठी लागणाºया पाच हजार वाती वळण्याचे काम आमच्या बचत गटाच्या माध्यमातून केले जाणार आहे. लक्ष दीपोत्सव यशस्वी करु या. -माधुरी चव्हाण,अध्यक्षा- सई महिला बचत गट.