सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन २३ जून तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन २४ जून २०२३ रोजी असून, अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात.
दरवर्षीपेक्षा पालखी सोहळ्यांचे प्रस्थान अगोदर होत असल्याने उन्हाळ्याचा त्रास वारकरी भाविकांना होऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेवून पालखी तळावर व मार्गावर मुबलक पाणी पुरवठा व पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवावा अशा सूचना प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोबरे यांनी दिल्या.
यावेळी प्र. जिल्हाधिकारी ठोंबरे म्हणाले की, वारकरी भाविकांना पालखी तळांवर, मार्गावर शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पाण्याच्या स्त्रोतांची व पाण्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. तसेच, भाविकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळेल यादृष्टीने आवश्यक ते नियोजन करावे.
आरोग्य विभागाने ओआरएस बरोबर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. गर्दीच्या ठिकाणी तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध, व्हावी यासाठी दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी आरोग्य दूत सुसज्ज ठेवावेत अशा विविध सूचना देण्यात आल्या. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी पालखी तळांवर व मार्गावर वारकरी भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. तर ६५ एकर, नदी पात्र तसेच शहरात नगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.