बाळासाहेब बोचरेसोलापूर: आषाढी वारी कधी येईल, पंढरपूरला कधी एकदा जाईन आणि सावळ्या विठुरायाला कधी एकदा कडकडून मिठी मारेन या उत्कट ओढीने हरिनामाच्या जयघोषात तल्लीन होऊन निघालेल्या संत सज्जनांच्या पालख्या पंढरीच्या वाटेला लागल्या आहेत.
सर्वात अगोदर खान्देशातून संत मुक्ताबाईने प्रस्थान केले. त्यापाठोपाठ संत गजानन महाराज, संत एकनाथ आणि संत निवृत्तीनाथांनी प्रस्थान केले. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ५ जुलैला तर सर्वांची माऊली म्हणून ख्यात असलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ६ जुलैला निघाली. रविवारी या दोन्ही पालख्या पुण्यात मुक्कामी होत्या.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम यापैकी संत सोपानदेव व नामदेवांची पालखी वगळता सर्व पालख्या झपझप पावले टाकत वाटचाल करत आहेत. संत सोपानदेवांची पालखी १० जुलैला सासवडहून निघणार आहे तर संत नामदेवांची पालखी पंढरपुरातून संतांच्या स्वागतासाठी काढली जाते. संत दामाजी पंतांची पालखी २१ जुलैला निघणार आहे. संत एकनाथ आणि संत मुक्ताबाई यांची बीड जिल्ह्यातून वाटचाल सुरू आहे. निवृत्तीनाथ नगरला आले आहेत तर गजानन महाराजांनी उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश केला आहे.
लहान-मोठ्या पालख्यांचीही दखल घेणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत वारकºयांची संख्या जास्त असते. त्यामुळे प्रशासन सर्व लक्ष त्यांच्यावर केंद्रित करते. इतर पालख्यांबरोबरही तुलनेने कमी असले तरी बºयापैकी वारकरी असतात. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. टेंभुर्णी ते नगर मार्गाचे चौपदरीकरण झाले तर निवृत्तीनाथांचा मार्ग सुकर होईल. - मोहनमहाराज बेलापूरकर, निवृत्तीनाथ पालखी सोहळा