कुर्डूवाडी : सख्या भावाने बहिणीला विहिरीत ढकलून दिल्याची घटना रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडी बायपास रोड जवळील काळे यांच्या विहिरीत घडली. सदरची महिला विहिरीत पडल्यानंतर मोटारीच्या पाइपला धरून तब्बल दीड तास पाण्यात होती, त्यानंतर क्रेनच्या साह्याने तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, सविता गोसावी (वय 30) ही महिला आपल्या माहेरी कुर्डुवाडी येथे आली होती. ती आपल्या मैत्रिणीला भेटायला गेल्यावर तिचा सख्खा भाऊ सचिन गोसावी यांनी तिला आणले व बायपास जवळील काळे यांच्या विहिरीत ढकलून दिले. तेथे शेतात काम करणाऱ्या महिलांना वाटले की दगड विहिरीत पडला. नंतर महिलांनी विहिरीत पाहिले असता विहिरीततील महिला मोठ मोठ्याने ओरडत होती. यावेळी तेथूनच एक इसम पळताना दिसला. शेतमजूर महिलांनी ओरडतच बायपासवरून जात असलेले किनारा उद्योग समूहाचे मालक हरिभाऊ बागल यांना सांगितले. हरिभाऊ बागल यांनी त्याचा पाठलाग केला मात्र तू बायपासच्या दुसऱ्या बाजूने पळून गेला.
शेतमजूर महिलांनी बाई विहिरीत पडली असे ओरडतच बायपास येथे येऊन गोंधळ केला. यादरम्यान तिथून जाणारे अमर कुमार माने, मुन्ना माने, दीपक शिंदे, खंडू मदने यांनी महिला विहिरीत पडल्याचे पाहिले. तातडीने त्यांनी कुर्डूवाडी पोलीस, ॲम्बुलन्सला फोन केला व क्रेनवाल्याला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. तोपर्यंत बघ्यांची गर्दी झाली होती. यातीलच फुलचिंचोली तालुका पंढरपूर येथून आंबेजोगाईला जाणारे दत्तात्रय कुंभार हे प्रवासी विहिरीत उतरले व क्रेनवाल्यांनी विहिरी सोडलेल्या दोराच्या सहाय्याने महिलेला वर उचलून काढली त्यानंतर अँब्युलन्समधून तिला ग्रामीण रुग्णालयात आणले प्रथम उपचार केल्यानंतर तिला सोलापूर येथे हलविण्यात आले.