पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात रूक्मिणीमातेस महिला भाविकांकडून सण, उत्सवानिमित्त अर्पण केलेल्या साड्यांचा सेल मंदिर समितीकडून लावण्यात आलेला होता. यामध्ये १३ हजार ५४० साड्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या़ त्यापैकी ८ हजार ३४४ साड्यांची विक्री होऊन २० लाख २१ हजार ४९० रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
विठ्ठल-रूक्मिणी दर्शनासाठी येणारे भाविक हे रोख देणगी स्वरूपात, वस्तू स्वरूपात देणगी देतात. रूक्मिणीमातेस महिला भाविक या श्रध्देने साडी तसेच ब्लाऊज अर्पण करीत असतात. यामध्ये विविध प्रकारच्या साड्यांचा समावेश असतो. नवरात्र, मकर संक्रांत आदी सणांच्या काळात बाहेरून दर्शनासाठी येणाºया महिला भाविकांची संख्या मोठी असते. मातेस अर्पण केलेल्या साड्यांचे वर्गीकरण करण्यात येऊन त्या मंदिर समितीकडून भाविकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात.
मंदिर समितीकडून २० डिसेंबर २०१९ ते १६ जानेवारी २०२० या काळात संत तुकाराम भवन येथे साडी सेल लावण्यात आलेला होता. यामध्ये एकूण १३ हजार ५४० साड्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या़ त्यापैकी ८ हजार ३४४ साड्यांची महिला भाविकांकडून खरेदी करण्यात आली. दररोज सरासरी ४० हजार रूपयांच्या साड्यांची भाविकांकडून खरेदी झाली. त्यामध्ये २३ डिसेंबर २०१९ रोजी एकादशीच्या दिवशी सर्वाधिक १ लाख १० हजार रूपयांची खरेदी झाली. मंदिर समितीकडून यासाठी २० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या साड्या उपलब्ध करून देण्यात येत होत्या.
महिला भाविकांकडून खरेदी केलेल्या साड्या
- - १०० रूपये किमतीच्या २८७०, २०० रूपये किमतीच्या १०००
- - ३०० रूपये किमतीच्या ५००, ५०० रूपये किमतीच्या ५१
- - ५००० रूपये किमतीची १ साडी
श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने रूक्मिणीमातेला अर्पण केलेल्या साड्यांचा सेल लावलेला होता. २६ दिवसांत महिला भाविकांचा यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साड्यांतून ८ लाख रूपयांचे अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.- विठ्ठल जोशी, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर