सोलापूर : महापालिकेतर्फे दुकानांवर छापा टाकून प्लास्टिक जप्त करण्यात येत आहे. तसेच फेरीवाल्यांकडूनही प्लास्टिक जप्त करण्यात येत आहे. यापासून वाचण्यासाठी काही विक्रेते हे सायकलवरून भाजी विक्रेते व फेरीवाल्यांना प्लास्टिकच्या बॅगांची विक्री करत आहेत. सायकलवरून जाताना भाजी विक्रेते व फेरीवाल्यांकडे कॅरीबॅग टाकाय़चे. वेळ मिळाल्यानंतर पैशांची वसुली करायची असा प्रकार निदर्शनास आला. शनिवारी झालेल्या कारवाईत अशा विक्रेत्यांकडूनही प्लास्टिक जप्त करून दंड घेण्यात आले.
महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या प्लास्टिक प्रतिबंध मोहिमेत ७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे एक लाख पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकमध्ये लहान व मोठी प्लास्टिकची पिशवी, प्लास्टिक व्रॅपर, धान्य ठेवण्याच्या पिशव्या, प्लास्टिकचे चमचे, ग्लास जप्त करण्यात आले. हातगाड्यावर साहित्य व फळे विक्री करणाऱ्यांकडूनही या मोहिमेतून प्लास्टिक जप्त करण्यात आले. महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या फक्त अर्धा तासाच्या कारवाईत ७० किलोपेक्षाही अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२०-२१ च्या अनुषंगाने माझी वसुंधरा अभियानअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शनिवारी उपायुक्त धनराज पांडे, सहायक आयुक्त विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य सफाई अधीक्षक एन. सी. बिराजदार, आठ मुख्य आरोग्य निरीक्षक, १६ आरोग्य निरीक्षक यांच्या पथकाने प्लास्टिक प्रतिबंध मोहीम राबविली. यामध्ये एकूण ४५ दुकाने व ४० फेरीवाले यांची तपासणी करून एक लाख पाच हजार दंड वसूल करण्यात आला.
मागील कारवाईत १८७ किलो प्लास्टिक जप्त
महापालिकेतर्फे यापूर्वी १० डिसेंबर रोजी प्लास्टिक प्रतिबंध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहराच्या मुख्य बाजारपेठेत तपासणी करण्यात आली. यातून १५ जणांवर कारवाई करण्यात आली. मोहिमेत १८७ किलो प्लास्टिक जप्त करून सुमारे ९५ हजार रुपये दंड आकारण्यात आला.