पंढरपूर : लॉकडाऊनच्या काळात पंढरपुरातील एका लॉजमध्ये राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यानेच दारूचा साठा केल्याचा प्रकार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास उघडकीस आणला आहे.
सहारा इन हॉटेल व लॉजवर ( वाखरी, ता. पंढरपूर) राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याने दारूचा साठा केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांना मिळाली होती. त्यांनी तत्काळ गुरुवारी पहाटे पो. ह. वामन यलमार, पो. कॉ. भोसले, पोलीस नाईक रोंगे, पो. कॉ. पंजाब सूर्वे, पो. कॉ. मुजावर हे पथक खाजगी मोटरसायकलवरून पाठवले.
त्यावेळी वाखरी येथील हॉटेल सहारा इन च्या खोली क्रमांक १०३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मिलींद मधुकर जगताप ( वय ४९, सध्या रा. पंढरपूर) याांनी परवाना नसताना १३ हजार ४३८ रुपये किमतीच्या विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्याचा साठा केल्याचे निदर्शनास आले.
त्याचप्रमाणे मद्याचा साठा विक्री करणे करिता दारूचा गुत्ता उघडण्यास व त्यावरील देखरेख ठेवण्याचे काम युवराज नेताजी पवार (रा. ढोक, बाभूळगाव, ता. मोहोळ) यांनी केले. या दोघांनी संगनमताने मद्यसाठा व विक्री करण्याकरता दारूचा गुत्ता लॉजमध्ये सुरू केला. यामुळे दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), ६८, ८३ प्रमाणे सपोनि नवनाथ गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला आहे.