एकतर हाताला काम नाही, शेतातील उत्पन्नाला बाजारात भाव नाही. शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक जोडधंदा असणाऱ्या दूध व्यवसायालादेखील कोरोनाचा जबर फटका बसला आहे. संचारबंदीमुळे पशुखाद्याच्या किमती वाढत असताना, गाईच्या दुधाचा भाव उतरल्याने एक लिटर बाटली बंद पाण्याच्या दरात दूध विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे.
सध्या राज्यातील संचारबंदीमुळे पशुखाद्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. मात्र, दूध दरात मोठी घसरण झाली आहे. गाईच्या दुधास प्रतिलिटर ३१ रुपये मिळणारा भाव संचारबंदीमुळे २० ते २३ रुपयांवर आला आहे. एकीकडे कोरोनामुळे आर्थिक संकट वाढत असताना दूध दराच्या घसरणीमुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. परिणामी नाइलाजाने शेतकऱ्यांना दुधाची विक्री प्रतिलिटर बाटलीबंद पाण्याच्या किमतीत करावी लागत आहे.
पशुखाद्यासह कडब्याचे दरही वाढले
जनावरांच्या खुराकाच्या वाढलेल्या किमती व चाऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांना एक लिटर दूध उत्पादनासाठी तब्बल २५ रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, हेच दूध सध्या २० ते २३ रुपये दराने विकले जात असल्याने, शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे जनावरांना लागणारा खुराकही लॉकडाउनमुळे वेळेवर मिळत नसल्याने, दुधामध्ये मोठ्या प्रमाणात घट येत आहे. शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे तसेच पशुखाद्यासह कडब्याच्या दरात वाढ झाल्याने आधीच संकटात सापडलेल्या दूध उत्पादकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.