सोलापूर : जिल्ह्यात दिवाळीची खरेदी सुसाट झाली असून वाहन क्षेत्रात अद्याप खरेदीचा उत्साह सुरू आहे. मागील चार दिवसात वाहन क्षेत्रात शंभर कोटी पेक्षा अधिक उलाढाल झाली असून चार हजार दुचाकी अन् पाचशे चार चाकी वाहनांची विक्री झाली आहे. दसरा पेक्षा दिवाळीत ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने ऑटोमोबाईल्स व्यावसायिक समाधानी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दिवाळीत चार हजार दुचाकी वाहनांची विक्री पहिल्यांदाच झाल्याची माहिती ऑटोमोबाईल्स व्यावसायिक घनश्याम चव्हाण यांनी दिली. विशेष म्हणजे, यंदा इलेक्ट्रिक बाइक अन् शानदार अशा बुलेट गाड्यांना ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. दिवाळीचे निमित्त साधून वित्तीय कंपन्यांकडून आकर्षक ऑफर्स होत्या. ग्राहकांनी या ऑफर्सचा लाभ घेतला. पेट्रोल पेक्षा सीएनजीच्या चार चाकी वाहनांची विक्री अधिक झाली आहे. पाचशे पैकी तीनशे सीएनजीच्या गाड्यांची विक्री झाल्याची माहिती देखील घनश्याम चव्हाण यांनी दिली. अधिक मायलेज देणाऱ्या दुचाकी वाहनांना मागणी होती. स्पोटर्स बाईक्सनाही चांगली मागणी राहिली. कमी वजनाच्या स्कूटी खरेदीकडे महिलांचा कल होता.