करमाळा तालुक्यात ४०० हेअर सलून दुकाने व १४५ फोटो ग्राफर आहेत. त्यापैकी करमाळा शहरात ४९, जेऊर, केम, साडे, केत्तूर, वांगी, कंदर या मोठ्या खेडयातून सलून व फोटो ग्राफर दुकाने आहेत. यातील ९० टक्के दुकाने भाड्याने आहेत. गतवर्षीच्या लॉकडाऊनमधील नऊ महिन्यांचे भाडे अद्याप थकले आहे. आता कुठे व्यवसाय रुळावर आला होता. त्यातच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने दुकानाचे भाडे भरावे की घरप्रपंच भागवावा, असा प्रश्न या व्यावसायिकांपुढे पडला आहे.
सलून व्यवसायात दीड हजार कारागीर तर फोटो काढण्याच्या व्यवसायात २०० जण आहेत. या सर्वांचा व्यवसाय बंद पडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लग्नसराईतील विवाह सोहळे, वाढदिवस, बारसे व इतर कार्यक्रमांवर बंदी आल्याने मागील वर्षी प्रमाणेच या वर्षीही समस्या निर्माण झाली आहे.
--------
रोजगार बुडाला
सलून दुकान व फोटो ग्राफरवाल्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक दुकानात केलेली आहे. सलून दुकानात किमती खुर्च्या, वातानुकूलित यंत्रणा, किमती शेव्हिंग क्रीम, अद्ययावत यंत्रणा उभारली आहे, तर फोटोग्राफरनी कॅमेरे, संगणक, ड्रोन व स्टुडिओ उभारले आहेत. यातून एडिटर, ग्राफिक, डिझाइनर,फोटो एडिटर, एक्सपोजिंग या अनेकांना रोजगार बुडाला आहे.
-----
लग्नसराई व इतर कार्यक्रमावर बंदी आल्याने आम्हाला कामे मिळत नाहीत. जोडधंदा नसल्याने घरप्रपंच कसा चालवायचा, हा प्रश्न आहे. सर्वच फोटोग्राफर अडचणींना सामोरे जात आहेत. त्यामुळे शासनस्तरावर आमचा विचार व्हावा.
- देवराम आरणे, फोटो ग्राफर
सलून व्यावसायिकांची दुकाने बंद करताना, त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार शासनाने केलेला नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने फेरविचार करून नियमाचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा आम्हाला आर्थिक मदत करावी.
- राजाभाऊ जगताप, अध्यक्ष नाभिक संघटना
----