सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते आहे. आता त्याचे लोण गावोगावी पोहोचू लागले आहे. बुधवारी आरोग्य विभागाकडून केलेल्या तपासणीमध्ये पंढरपूर शहरात दोन तर तालुक्यातील उपरीत १, गोपाळपूर १, करकंब १ असे एकूण ५, माळशिरस तालुक्यातील अकलूज २, अक्कलकोट शहरामध्ये २ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे १ अशा दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, बार्शी तालुक्यातील दहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी सोलापूरला पाठवले आहेत. गावोगावी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी आरोग्य प्रशाासन सतर्क झाले आहे. कोरोनाचे हे लोण आता जिल्ह्यात पोहोचू लागले आहे. चिंतेपोटी गावागावातून आपल्या पै-पाहुण्यांना चौकशीसाठी फोन खणखणू लागले आहेत.
अकलूज परिसरात बफर क्षेत्र घोषितअकलूज : संग्रामनगर (ता. माळशिरस) येथील किराणा होलसेल व्यापाºयाच्या पत्नी व मुलाचा कोरोना संसर्ग तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने अकलूजसह संग्रामनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे अकलूज, संग्रामनगर ग्रामपंचायतीने सतर्कता बाळगत परिसरात निर्जंतुकीकरणाची फवारणी केली आहे. तर महसूल प्रशासनाने संग्रामनगरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र तसेच बफर क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. आरोग्य यंत्रणा या पार्श्वभूमीवर गतिमान झाली आहे. संक्रमित व्यक्तीच्या कुटुंबातील चार व्यक्तींसह घरकाम करणाºया दोन महिला, दूधवाला, दोन कामगार, हमाल, वाहनचालक असे ११ जणांचे स्वॅब तपासणीसाठी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले आहेत.
बार्शी तालुक्यात आणखी दहा जणांचे घेतले स्वॅबबार्शी: मंगळवारी रात्रीच्या अहवालामध्ये तालुक्यातील जामगाव येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह (सारी) निघाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले़ बुधवारी जामगावच्या चार, वैरागचे तीन आणि बार्शी शहरातील तीन अशा दहा जणांचे स्वॅब घेण्यात आले. दरम्यान, जामगावला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाची दहा पथके तयार केल्याची माहिती तहसीलदार प्रदीप शेलार यांनी दिली़
दक्षिण तालुक्यातील सात गावे बफर झोन सोलापूर : बोरामणी येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण वास्तव्यास असलेल्या गल्लीसह आजूबाजूचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बोरामणी येथे आढळून आला आहे. हा रुग्ण पोलीस कर्मचारी असून, त्याला दोन दिवसांपूर्वी त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्या स्वॅब चाचणीचा अहवाल आज बुधवारी प्राप्त झाला. त्यात तो पॉझिटिव्ह निघाला़
अक्कलकोटमध्ये कोरोनाचे आणखी आढळले दोन रुग्ण अक्कलकोट : शहरात कोरोनाचे रुग्ण आढळताच मंगळवारी घेण्यात आलेल्या ४१ स्वॅबपैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ उर्वरित ३६ अहवाल हे निगेटिव्ह तर ३ जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. आता अक्कलकोटकरांची चिंता वाढली आहे.