सोलापूर: माझ्या अटकेसाठी आंदोलन करणारे लोक राज्यातील बलात्काऱ्यांविरोधात आंदोलन का करत नाहीत, असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला. ते बुधवारी सोलापूर येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना धारेवर धरले. राज्यकर्त्यांकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर प्रतिष्ठा व सत्ता मिळविण्यासाठी केला जातो. त्यासाठी शिवजयंतीच्या दिवशी मोठे उत्सवही साजरे केले जातात. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्रात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडतात, याचा राज्यकर्त्यांना विसर पडतो. तसेच आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्राला दारूड्यांचे राज्य म्हणावे लागेल, अशी टीकाही संभाजी भिडे यांनी केली.
शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात 289 लहानमोठ्या लढाया लढल्या. याचा हिशेब मांडायचा झाल्यास वर्षातून महाराज दहा-अकरा वेळा मृत्यूला सामोरे जात असत. त्यावेळी समाज इतका ढोंगी नव्हता. देशातील लोकांना मराठ्यांचा हा इतिहास शिकवला पाहिजे. जे राष्ट्र आणि समाज आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, त्यांना राष्ट्राची उभारणी करता येत नाही, असे भिडे यांनी म्हटले.