सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आपापली भूमिका पार पाडावी. यापुर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्दावर ५८ मोर्चे काढले, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास पुणे ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात येईल असा इशारा खा. छत्रपती संभाजीराजे महाराज यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज बुधवारी सकाळी त्यांनी मोहोळ येथे जनसंवाद यात्रेचा प्रारंभ केला. मोहोळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती संभाजीराजे पायी चालत सभास्थळी निघाले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी दीड किलोमीटरचा प्रवास पायी चालत केला. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही चालत निघाले होते.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाला योग्य न्याय न मिळाल्यास पुणे-मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे. त्याची पहिली ट्रायल सोलापुरात घेतली. यापुढे ज्या जिल्ह्यात जनसंवाद यात्रा होईल त्या पहिल्या टप्प्यात ३५ किलोमीटर चालायचे. त्यामुळे दोन दिवस चालत फिरूयात, दाखवूयात की छत्रपतीसोबत रयतेसोबत चालत जाऊ शकतात. आंदोलने, निर्देशने, मोर्चे काढून काहीच उपयोग झाला नाही. जर आमच्या मागण्या मान्य हाेत नसतील तर आम्हाला लाँग मार्चशिवाय पर्याय नाही असेही संभाजीराजे म्हणाले.