सोलापूर : मुलगी पदवीधर तर मुलगा बागायतदार शेतकरी... दोघांचे लग्नही ठरलेले... २३ एप्रिल २०१९ रोजी इंद्रप्रस्थ हॉलमध्ये थाटामाटात लग्नही होणार होते... मात्र रविवारी साखरपुडा झाल्यावर गप्पा रंगल्या अन् मुलीच्या काकाने लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. वधू-वरांकडील मंडळींनी होकार देताच अवघ्या काही तासांमध्ये रविवारी सायंकाळी साडेसहाच्या गोरजमुहूर्तावर विवाह पार पडला. फलटणचे बागायतदार गणेश जाधव यांच्या गळ्यात गीता खुळे हिने वरमाला घातली. झटपट लग्नात समोशावर ताव मारत वºहाडी मंडळी सुखावली.
त्याचे असे झाले, बाळे येथील एलएचपीमध्ये नोकरीस असलेले सतीश खुळे यांची गीता ही मुलगी. काही दिवसांपूर्वी तिचे लग्न फलटण येथील गणेश जाधव या बागायतदार युवा शेतकºयाबरोबर जमले होते. २३ एप्रिल २०१९ ही तारीखही काढण्यात आली. जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील इंद्रप्रस्थ हॉलही बुक झाले. आचारी, बॅन्ड, घोडा आदींची बुकिंगही करण्यात आली. रविवारी सकाळी एन. जी. मिल चाळीतील घरात साखरपुडा पार पडला. फलटणहून आलेल्या २५ ते ३० वºहाडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर वधू अन् वरांकडील मंडळी गप्पा मारत बसली होती.
बारामती येथील मुलीचे मामा किसन शिंदे यांनी आजच्या आज लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. दोन्हीकडील मंडळींनी त्यास होकार दिला. त्यावेळी दुपारचा एक वाजला होता. रविवारी सायंकाळी ६.३० या गोरज मुहूर्तावर लग्न करण्यावर साºयांचेच एकमत झाले. म्हणता-म्हणता मुलीसाठी शालू, बांगड्या, मंगळसूत्र तर मुलासाठी खास पोशाख मागविण्यात आले. फोनाफोनी करून मुलीच्या मैत्रिणींना बोलावून घेतले. इकडचे अन् तिकडचे असे १०० वºहाडी मंडळी जमली. घराजवळच असलेल्या हनुमान मंदिरात नववधू-वराने दर्शन घेतले आणि काही मिनिटांतच उभारण्यात आलेल्या मांडवात दोघे विवाहबद्ध झाले. भोजन म्हणून समोश्यांचा आस्वाद वºहाडी मंडळींनी घेतला.
मुलीने दिले शेतकरी वरास प्राधान्य- नववधू गीता खुळे ही शिकलेली. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गीताने शिकलेला नव्हे तर उच्च शिक्षित अन् तेही उच्च पदावर नोकरीस असलेला जीवनसाथी निवडणार, अशीच धारणा होती. मात्र वडिलांनी आपल्यासाठी जे स्थळ जमविले, ते नक्कीच माझा विचार करूनच निवडले असतील, ही खूणगाठ बांधून गीतानेही वडिलांंचा विश्वास सार्थ ठरवत फलटणच्या या बागायतदार वराच्या गळ्यात वरमाला घालत इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
रविवारी सकाळी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रण मिळाले. मात्र महत्त्वाच्या कामासाठी जाणे जमले नाही. दुसरा निरोप आला की, लग्नाला या. काहीच कळेना. साखरपुडा कोणाचा अन् लग्न कोणाचे? हा प्रश्न घेऊनच लग्नमांडवात गेलो तर काय साखरपुडा झालेल्या त्या नववधू-वरांचेच लग्न होते. दोन्ही कुटुंबांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे.-विनोद भोसले, नगरसेवक.