सोलापूर : जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस जगाचा निरोप घेणारच... शनिवारी रात्री अंत्यसंस्कार केलेली चिता सकाळपर्यंत जळत होती. एकीकडे चिता जळत असताना दुसरीकडे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य कठड्याखाली व आजूबाजूला पडलेली राख आणि कचरा गोळा करीत होते. सकाळी ७ पासून १0.३0 पर्यंत १२५ ते १५० सदस्यांनी पावसाची पर्वा न करता संपूर्ण शहरात असलेल्या ११ स्मशानभूमीची स्वच्छता केली.
- - कुणाच्या हातात फावडा, कुणाच्या हातात कुºहाड, झाडू, टोपली, सत्तूर, कुणी कुणाला काही सांगत नाही. स्वच्छता करण्यात सगळेच मग्न. लष्करी शिस्त कशी असते याचे उदाहरण म्हणजे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छता अभियान. मोदी स्मशानभूमीत धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले. काटेरी झुडपांनी वर्षानुवर्षे वेढलेल्या समाधींनी मोकळा श्वास घेतला.
- - सकाळी सात वाजता सुरू झालेले अभियान दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. स्मशानभूमीच्या बाहेर कार, मोटरसायकल, सायकली पार्क करण्यात आल्या होत्या. अभियान राबविताना कारमधून आलेला साधक आणि सायकलवरून आलेला सदस्य यांच्यात भेद नव्हता. तितक्याच तळमळीने सर्व सदस्य अभियान राबवत होते.
५५० साधकांनी गोळा केला ४ टन कचरा- धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या बैठकीमध्ये येणाºया वेगवेगळ्या ठिकाणच्या सदस्यांनी मोदी स्मशानभूमीत स्वच्छता केली. यात ताकमोगे वस्ती, गोविंद पार्क, सलगर वस्ती, अभिमानश्री येथील साधकांचा सहभाग होता. सुमारे ५५० सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले. महापालिकेची जेसीबी मशीन व ट्रक यांनीही या अभियानाला मदत केली. या अभियानातून चार टन कचरा गोळा करण्यात आला.
पावसाला न जुमानता केली स्वच्छता- अभियानाची वेळ सकाळी सात वाजल्यापासूनची होती. तर पहाटे सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली; मात्र सदस्यांच्या मनात पावसाची काळजी नव्हती. दिलेल्या वेळी त्यांनी स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले आणि तडीस नेले सुद्धा. पाऊस पडत असल्याने स्वच्छता अभियान होईल की नाही याबाबत कुणाच्याही मनात शंका नव्हती.
कुंपणाला तिरडीच्या लाकडाचा आधार- स्मशानभूमीत अस्ताव्यस्त पडलेल्या तिरडीची लाकडे साधकांनी गोळा केली. ही लाकडे फेकून न देता यापासून लाकडाचे कुंपण बनवण्यात येणार आहे. झाडे लावल्यानंतर त्यांना धोका पोहोचू नये, यासाठी तयार करण्यात येणाºया कुंपणाला तिरडीच्या लाकडाचा आधार देण्यात येत आहे.
इतक्या साहित्यांचा झाला वापर- स्वच्छता अभियान राबवताना काही साहित्यांचा वापर करण्यात आला. काहींना प्रतिष्ठानतर्फे साहित्य पुरवण्यात आले तर काहींनी घरुन येतानाच साहित्य आणले होते. मोदी स्मशानभूमीत ५०० जणांनी फावडे - ४८ , कुºहाड - ८०, टोपली - १६०, सत्तूर - ६० , झाडू - ६० अशा ४०८ साहित्यांचा वापर करण्यात आला.