मोहोळ तालुक्यातील कोरोना रुग्णांची व त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे लक्षात घेऊन झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी तालुक्यातील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी तालुक्यातील मोठ्या गावात कोविड सेंटर सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, तालुका प्रशासनाच्या वतीने मोहोळ शहरात कृषी विज्ञान केंद्र व फाटे मंगल कार्यालयात कोरोना सेंटर सुरू केले आहेत. आता मोहोळ तालुक्यातील कुरुल, अनगर, पेनूर, पाटकुल, आष्टी, टाकळी सिकंदर, शेटफळ, नरखेड, अंकोली व वडवळ अशा १० ठिकाणी कोरोना सेंटर मंजूर केले आहे. १ मे रोजी चालू करण्यात येणार असल्याचे गणेश मोरे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण पाथरूडकर यांनी सांगितले. कोरोना सेंटरमुळे त्या त्या परिसरातील रुग्णांची गावातच सोय होणार आहे. त्यामुळे शहरातील कोविड सेंटरवर पडणारा रुग्णसंख्येचा ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पाथरूडकर यांनी मंजुरी दिलेल्या कोविड सेंटरच्या जागेची पाहणी करून तेथील व्यवस्था कशी आहे. काय सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील याची माहिती घेतली. यावेळी कुरुल आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय घाटुळे, ग्रामविकास अधिकारी जे. एस. भोसले उपस्थित होते.