टेंभुर्णीसह परिसरातील ४० हजार नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी टेंभुर्णी येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात यावे, या मागणीसाठी बशीर जहागीरदार हे लढा देत होते. ऑगस्ट २०१७ साली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. यानंतर त्यांनी मुंबई येथेही आझाद मैदानावर दोन दिवसाचे उपोषण केले. तरीही शासन स्तरावरून कोणताच निर्णय होत नसल्याने जहागीरदार यांनी २०१८ साली नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू असताना ७ दिवसाचे उपोषण केले. याची दखल घेऊन प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न विधिमंडळात लावून धरला.
यावेळी शासनाने टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयासाठी बजेट मंजूर करण्यासाठी संबंधित खात्याकडे पाठवले होते. मात्र यापुढे हा विषय सरकत नव्हता म्हणून जहागीरदार यांनी २०१९ साली टेंभुर्णी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांसह तीन दिवसाचे उपोषण केले. तसेच २२ मार्च २०२० रोजी टेंभुर्णी बंद आंदोलन केले.
शासन निर्णयाची प्रत प्राप्त
या प्रश्नासाठी पुढील आंदोलनाच्या तयारीत असतानाच अखेर चालू अधिवेशनात शासनाने जहागीरदार यांच्या मागणीची दखल घेऊन ८ मार्च रोजी विशेष बाब म्हणून टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालयात मंजुरी दिली आहे. संबंधित शासन निर्णयाची प्रत जिल्हा आरोग्य विभागाने जहागीरदार यांना दिली आहे.