दरम्यान सांगोला आगारातून सलग दोन दिवस टेम्पो पळवून नेण्याच्या घटना घडल्यानंतर पोलिसात अद्याप गुन्हा दाखल न झाल्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारवाईबद्दल जनतेतून उलट सुलट चर्चा सुरू आहे.
कडलासचे तलाठ्याने माण नदी पात्रातून विनापरवाना बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना पकडलेली पाच वाहने बुधवारी सकाळी १० च्या सुमारास सांगोला आगारात आणून लावली होती. त्यापैकी एक टेम्पो २४ तासाच्या अज्ञात टेम्पो मालकाने गुरुवारी भल्या पहाटे ५:३० च्या सुमारास सांगोला आगाराचे गेट तोडून पळवून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर तहसीलदार अभिजित पाटील यांनी कोतवालास संबंधित टेम्पोचालक मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. चोवीस तासानंतरही कोतवालांनी तक्रार दिली नाही.
ही घटना ताजी असताना शुक्रवारी सकाळी ६ च्या सुमारास तलाठी पिसे यांनी वाळूसह जप्त केलेल्या ५ वाहनापैंकी ४०७ च्या चालक -मालकाने विना नंबरचा टेम्पो वाळूसह टेम्पो आगारातून बाहेर काढून सुसाट वेगाने निघाला. यावेळी वाहन परीक्षक सुबराव सरवदे व सुरक्षा रक्षक बापू राऊत यांनी हा टेम्पो रोखण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने तो त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. दोघे प्रसंगावधान राखून बाजूला झाल्याने त्यांनी गेट तोडून टेम्पो पळवून नेला. या घटनेत सुदैवाने सुरक्षारक्षक व वाहन परीक्षक बालंबाल बचावले.
आगार प्रमुख पांडुरंग शिकारे यांनी तुटलेले गेट दुरुस्त करून बसवले होते मात्र शुक्रवारी पुन्हा गेट तोडल्याची घटना घडली. आगार प्रमुखांनी जप्त केलेली वाळूची वाहने आगारात आणून लावू नका, असे सांगूनही काही उपयोग होत नसल्याचे स्पष्ट केले.
-----
चारही चाकांची हवा सोडली पाहिजे
महसूल प्रशासनाकडून जप्त केलेले वाहन आगारात लावताना चारीही चाकांची हवा सोडली पाहिजे किंवा बॅटरी काढून ठेवली पाहिजे. मात्र त्यांच्याकडून अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहन पळवून नेण्यास सहज शक्य आहे. महसूल प्रशासनाने जप्त केलेली वाहने इतर ठिकाणी लावावीत अन्यथा सुरक्षा बजावताना आमच्या जीविताला धोका आहे
- बापूराव राऊत ,सुरक्षारक्षक