सोलापूर : सोरेगाव येथील सीना नदीच्या पात्रातील बेकायदा वाळू उपसा करून, विक्रीसाठी जात असताना धाड टाकलेल्या पोलिसाला मारहाण व दगडफेक करून दहा आरोपी पळून गेले. हा थरार शनिवारी रात्री ९.३0 वाजता घडला. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दशरथ सोबण्णा भोसले, रवी भरले, तम्मा भरले, दीपक भरले, राहुल शिंदे, पप्पू खडाखडे, शिवा स्वामी, सिद्धू खडाखडे, राम चनप्पा भरले, सिद्धाराम संगप्पा संगोळगी व अन्य दोन इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सोरेगाव येथे सीना नदीच्या पात्रातून बेकायदा वाळू उपसा करून टेम्पोद्वारे वाहतूक होत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. माहितीवरून पथकातील पोसई अमोल सुभराव तांबे, पोलीस कॉन्स्टेबल दयानंद आण्णाराव बेल्लाळे, उत्तरेश्वर घुले, आनंद डिगे, मोहन तळेकर, अक्षय कांबळे, कोडिंबा मोरे, नवनाथ थिटे हे कारवाई करण्यासाठी गेले होते. तुकाराम रजपूत यांच्या समशापूर येथील वस्तीजवळ नदीकडून वाळू भरलेले दोन टेम्पो येत होते. पोलिसांना पाहून चालक पळून जात असताना सिद्धाराम संगप्पा संगोळगी याला पकडण्यात आले.
सिद्धाराम संगोळगी याला ताब्यात घेऊन टेम्पोसह पोलीस स्टेशन येथे कारवाईसाठी नेत असताना विजापूर रोडवरील ब्रिजधाम आश्रमसमोर आठ ते दहा लोक मोटरसायकलवर आले. त्यातील एकाने चालक सिद्धाराम संगोळगी याला टेम्पोतून बाहेर काढले. पोलीस ओळख सांगत असताना सर्वांनी पोलिसांना धक्काबुक्की करून पोलीस कॉन्स्टेबल योगेश येवले यांना मारहाण केली.
टेम्पोच्या पाठीमागील अन्य पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. आलेल्या लोकांपैकी एकाने दगड मारल्याने पोलीस कॉन्स्टेबल दयानंद बेल्लाळे जखमी झाले. अचानक दगडफेक सुरू झाली, त्यात पोलीस कॉन्स्टेबल योगेश येवले यांनाही दगड लागल्याने जखमी झाले. दगडफेक करून आरोपी पळून गेले. पोलिसांनी वाळूने भरलेले दोन्ही (क्रमांक एम.एच.१७ सी-५६७२) आणि (क्रमांक एम.एच.४४ आर-१५0४)टेम्पो जप्त केले. तपास सहायक पोलीस निरीक्षक वाबळे करीत आहेत.
सध्या बांधकामासाठी वाळुचा तुटवडा मोठ्याप्रमाणात जाणवत असल्यामुळे चढ्या दराने वाळु खरेदी केली जात आहे. वाळु माफीयांना वाळुचा तुटवडा लाभाचा ठरत असुन, चोरून वाळु उपसा करणे व ती शहरात ठिकठिकाणी विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसा कमाविने नित्याचे झाले आहे. पैशाच्या लालासेपोटी वाळु माफिया कायदाही हातात घेण्यास मागेपुढे पहात नाहीत.
पोलिसाच्या मोटरसायकलची मोडतोड...- ब्रिजधाम वृद्धाश्रमासमोर आरोपींनी दगडफेक केली़ यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल उत्तरेश्वर घुले यांच्या मोटरसायकल (क्र.एम.एच-४४ आर-१५0४) ची मोडतोड झाली. यामध्ये मोटरसायकलची टाकी, टाकीच्या खालचे मरगाड, हॅन्डल, नंबर प्लेट, साईड कव्हर असे एकूण १0 हजार रूपयांचे नुकसान झाले.