बार्शी : श्रीपतपिंपरी-भोइंजे दरम्यान घोर ओढ्यातून बेकायदेशीर वाळू उपसा करून वाहून नेणारा ट्रॅक्टर बार्शी तालुका पोलिसांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे पकडला. या कारवाईत नऊ हजारांची वाळू आणि साडेपाच लाखांचा ट्रॅक्टर जप्त केला आहे, तसेच या प्रकरणात दोघांना अटकही केली आहे.
शनिवारी सकाळी श्रीपतपिंपरी-भोइंजे येथील घोर ओढ्यात बार्शी तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल माधव धुमाळ यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली असून, ट्रॅक्टर चालक विशाल नाना पाटील (वय २३), मजूर सौरभ बापू पिंगळे (वय २३) व मालक महेश कल्याण ताकभाते (वय २५ रा.तिघे रा.श्रीपतपिंपरी, ता.बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस नाईक अभिजीत घाटे करत आहेत.
---
संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांना कळविलं
या परिसरात वाळूचा बेकायदेशीर उपसा मोठ्या प्रमाणात आहे. याला स्थानिक शेतकरी कंटाळले होते. शनिवारी पहाटे एक ट्रॅक्टर वाळू भरून गेला. ही चोरटी वाळू वाहतूक काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. दरम्यान, हा ट्रॅक्टर पुन्हा वाळू उपशासाठी आला असता, तेथील शेतकऱ्यांनी पोलिसांनी कळवत सतर्कता दाखविली. दरम्यान, पोलीस हवालदार माधव धुमाळ, हवालदार भारत शिंदे, पोलीस शिपाई गणेश चव्हाण, पोलीस नाईक अभिजीत घाटे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर व चालकासह दोघांना ताब्यात घेतले.