पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशान्वये पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील, पोलीस काॅन्स्टेबल अमर पाटील, चव्हाण, मुजावर हे गुरुवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास सांगोला शहर हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यांना बातमीदारामार्फत गावडेवाडी चौक ते कोपटेवस्ती रस्त्यावर वाहने अवैध वाळू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. यावेळी पोलीस कर्मचारी जुना सावे रोडवरून जात असताना माण नदीपात्रातून एमएच ०५/ बीके४३५ हा पिकअप समोरून येत होता. त्याच्या चालकास वाहन बाजूला घेण्यास सांगितले असता तो वाहन थांबवून पळून गेला. त्यानंतर लगेच पाठीमागून एमएच १३ /सीजे ११२४ व विना नंबरचा ४०७ टेम्पो नदीपात्रातून एकामागून येत असताना दिसले. पोलिसांनी त्यांनाही थांबवण्यास सांगितले असता वाहने थांबून दोघेही पळून गेले. पोलिसांनी तिन्ही वाहनांची तपासणी केली असता प्रत्येकी पाव ब्रासप्रमाणे दीड ब्रास वाळू व ४०७ टेम्पोत १ ब्रास वाळू असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी ४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या तीन वाहनांसह ८ हजार रुपये किमतीची अडीच ब्रास वाळू असा सुमारे ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वाहने ताब्यात घेतली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील यांनी नवनाथ जगन्नाथ खांडेकर (रा. धायटी), दत्ता हजारे (रा. हजारेवस्ती), भाऊसाहेब जानकर (रा.कोपटेवस्ती, ता. सांगोला) व अविनाश बिरुदेव कोळेकर (रा. शेटफळे, ता. आटपाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.