पंढरपुरातून सात वेळा खासदार राहिलेले संदीपान थाेरात यांचे निधन
By राकेश कदम | Published: March 31, 2023 07:41 PM2023-03-31T19:41:46+5:302023-03-31T19:58:22+5:30
संदिपान थाेरात हे मूळचे माढ्याचे. पंढरपूर लाेकसभा राखीव मतदारसंघातून ते १९७७ साली प्रथम निवडून आले. त्यानंतर सलग ७ वेळा १९९९ पर्यंत ते या मतदारसंघातून निवडून आले.
साेलापूर : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार संदीपान थाेरात (वय ९१) यांचे शुक्रवारी सायंकाळी आजारपणाने निधन झाले. पंढरपूर लाेकसभा मतदारसंघातून ते सातवेळा निवडून आले हाेते.
थाेरात यांच्यावर गेल्या एक महिन्यापासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी १५ दिवसांपूर्वी त्यांची आणि कुटुंबीयांची भेट घेतली हाेती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा हाेत असल्याचे डाॅक्टर सांगत हाेते. मात्र शुक्रवारी प्रकृती बिघडली आणि सायंकाळी निधन झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले.
संदिपान थाेरात हे मूळचे माढ्याचे. पंढरपूर लाेकसभा राखीव मतदारसंघातून ते १९७७ साली प्रथम निवडून आले. त्यानंतर सलग ७ वेळा १९९९ पर्यंत ते या मतदारसंघातून निवडून आले. त्यांना गांधी कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या पश्चात पत्नी सुखबाई, चार मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.