सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत, केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत. परंतू महाविकास आघाडीला झुकविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आता आरक्षण मिळविण्यासाठी गुळगुळीत आंदोलन न करता राज्यभरात मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापुरात दिला. नसल्याचेही पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शनिवारी मराठा क्रांती संघर्ष मोर्चा संदर्भात अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, शहाजी पवार, अनंत जाधव, इंद्रजित पवार, राम जाधव, किरण पवार, राम जाधव, अजिंक्य पाटील, श्रीकांत घाडगे, सोमनाथ राऊत, शाम कदम यांच्यासह समाजातील युवकांची मोठी उपस्थिती होती.
पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणप्रश्नासाठी पंतप्रधानांना भेटायला गेलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे किंवा छत्रपती उदनराजे यांना का घेऊन गेले नाहीत असाही सवाल नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री हे फक्त मराठा आरक्षणासाठी म्हणून भेटायला गेले नव्हते, तर ते १२ प्रकरणे घेऊन पंतप्रधानांना भेटायला गेले होते. यावरूनच महाविकास आघाडी किती आक्रमक आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सिध्द होते. महाविकास आघाडी सरकारने आयोगाची नेमणूक केली मात्र त्यात एकाही मराठा समाजाच्या व्यक्तींचा समावेश नसल्याचे सांगितले.