पुणे विभागातील पाच जिल्ह्यांचा सरासरी पाऊस वेगवेगळा आहे. विभागात
कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी पाऊस सर्वाधिक असून सोलापूर सर्वात कमी आहे. या सरासरीची आकडेवारी शासन दरबारी गृहीत धरली जाते. याच आकडेवारीवर नजर टाकली असता सांगली जिल्ह्यात सर्वाधिक त्यानंतर सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सर्वात कमी पाऊस पुणे जिल्ह्यात नोंदला आहे.
पुणे विभागात कालपर्यंत सरासरी ८०७ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ७१९ मि.मी. म्हणजे ८९.१ टक्के पाऊस पडला आहे. मागील वर्षी ७२२.८ मि.मी. म्हणजे ८९.२ टक्के पाऊस पडला होता. यावर्षी अवघा ०.०१ टक्के पाऊस कमी आहे.
सांगली जिल्ह्यात सरासरी ४०४ मि.मी पाऊस पडणे अपेक्षित होते प्रत्यक्षात ६१७ मि.मी. म्हणजे १५२.८ टक्के पाऊस पडला आहे. सोलापूर जिल्ह्यात ३४० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ४१५ मि.मी. म्हणजे १२२ टक्के इतका पाऊस पडला आहे. त्यानंतर सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आहे.
...........
जिल्हा /अपे.पा./पड.पा./टक्के
पुणे ७३६ ५६६ ७६.८
सोलापूर ३४० ४१५ १२२
सातारा ७५८ ७७६ १०२.३
सांगली ४०४ ६१७ १५२.८
कोल्हापूर १५७४ १३०२ ८२.७
एकूण ८०८ ७१० ८९.१
...........
चौकट
महाळुंग मंडलात सर्वाधिक पाऊस
सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात दररोज पाऊस पडत असल्याने जून, जुलै, ऑगस्ट व ५ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १२२ टक्के पाऊस पडला आहे. ५ सप्टेंबरपर्यंत महाळुंग मंडलात सर्वाधिक २२८ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मंगळवेढा (१८७ टक्के), कामती बु. (१६८.५), पानगाव (१६५.४ टक्के), सावळेश्वर (१६४.७ टक्के), शेटफळ (१६०.२ टक्के), चपळगाव (१५५.२ टक्के), मारापूर( १५३.६ टक्के) या मंडळात १५० टक्के पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. उपळेदुमाला, पांगरी, सुर्डी, खांडवी, दुधनी, भाळवणी, पटवर्धन कुरोली, इस्लामपूर, सदाशिवनगर, दहिगाव, नातेपुते, अकलूज, कुर्डूवाडी, रांजणी, करमाळा, जेऊर, कोर्टी, उमरड व केत्तूर या १९ मंडलांत १०० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.