ब्रिटिशकालीन सांगोला तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १८८७-८८ मध्ये दगड माती चुन्यात झाले आहे. संपूर्ण इमारतीवर लाकडाचा वापर करून कौलारूने आच्छादन केले होते. शेकडो वर्षानंतर कार्यालयाची इमारत पावसाळ्यात गळत होती तर अंतर्गत बांधकाम जीर्ण होत चालल्यामुळे पडझड होत आहे. कार्यालयाच्या दुरुस्तीबरोबरच रंगरंगोटीची गरज होती.
दरम्यान तहसील कार्यालयासह रेकॉर्ड रूम, पुरवठा शाखा, निवडणूक शाखा, संजय गांधी निराधार योजना कार्यालय, ट्रेझरी, दुय्यम कारागह , दुय्यम निबंधक कार्यालय अशी विविध शासकीय कार्यालय येथे एकत्र कार्यरत असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांची नेहमी गर्दी असते.
अशातच तहसीलमधील फर्निचरची अवस्थाही बिकट झाल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन तहसीलदार अभिजित सावर्डे- पाटील यांनी सांगोला तहसील कार्यालयाच्या नूतनीकरणासह फर्निचरसाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी मिळावा म्हणून आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती.
दरम्यान आ. पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यातून तहसीलच्या नूतनीकरणासाठी २५ लाखाच्या निधीची तरतूद करावी अशी शिफारस पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती, पालकमंत्र्यांनी या पत्राची दखल घेऊन २५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे.
ब्रिटिशकालीन सांगोला तहसीलची इमारत १३५ वर्षे जुनी झाल्याने तिची दुरुस्ती देखभाल रंगरंगोटीची गरज होती. जिल्हा नियोजन समिती मधून २५ लाखाचा निधी मंजूर झाल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
-----
निधीची कमी पडू देणार नाही - शहाजीबापू पाटील
शेकडो वर्षांच्या कालावधीत तहसील कार्यालयाच्या दुरुस्ती देखभालीसाठी भरीव निधीची तरतूद झाली नाही. यामुळे दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली होती. आ. शहाजीबापू पाटील यांच्या शिफारशीनंतर नूतनीकरणासाठी २५ लाखाची तरतूद झाल्याने कार्यालयाचे भाग्य उजळले आहे.